
दोडामार्ग : झरेबांबर पं. स. गणातील जनतेला परिवर्तन हवे असून हीच भावना सर्वसामान्यांमध्ये ठामपणे उमटत असल्याचे प्रतिपादन झरेबांबर पंचायत समिती महायुतीच्या उमेदवार स्नेहा गवस यांनी केले.
जनतेच्या अपेक्षा ओळखून त्यावर प्रामाणिकपणे काम करण्याचा आपला निर्धार असून सत्तेत आल्यानंतर दिलेल्या शब्दाला न्याय देण्याची ग्वाही त्यांनी दिली. झरेबांबर सरपंच पदाच्या कार्यकाळात महिलांसाठी जोमाने काम केले असून पुढील काळातही प्रत्येक महिलेच्या स्वावलंबनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी ठोस पावले उचलली जातील. महिलांचे स्वयं-सहायता गट स्थापन करून त्यांच्यामार्फत विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य दिले जाईल, असेही गवस यांनी सांगितले. महिलांचा आर्थिक सक्षम करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी पुढाकार घेऊन काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.










