
कुडाळ : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंदाजपत्रक सादर केले. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसोबतच सर्व घटकांना न्याय देणारा आणि सर्वसमावेशक आहे. त्याच बरोबर कोकणसाठी नारळ, काजू, मासे, पर्यटन आणि पशुपालन अशा गोष्टींवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे, नारळ आणि काजू यांचे संवर्धन करण्यासाठी विशेष योजना राबविली जाणार आहे. त्याचबरोबर मत्स्यपालनसाठी ५०० अमृत जलाशय उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणवासियांसाठी हे बजेट फार उपयुक्त आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. कुडाळ भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भाजप कार्यालयात निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं बजेट पूर्णपणे ऐकण्यात आले. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप कडून येत्या १० फेब्रुवारीपर्यंत केलं जाणार असल्याचेही श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत मांडलेला अर्थसंकल्प येथील भाजप संपर्क कार्यलयात आज जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी टीव्हीवर पाहिला. त्यांनतर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रणजित देसाई, संध्या तेरसे, संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, सुधीर झांट्ये, बंड्या सावंत, सुनील बांदेकर, राजू गवंडे, किरण शिंदे, ममता धुरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. सावंत म्हणाले या सगळ्या अर्थसंकल्पातल्या तरतुदींविषयी भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर एक विशेष जबाबदारी दिलेली आहे. आजच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही तरतुदी होतील त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार आणि प्रचार अभियान या दहा तारीख पर्यंत सुरू आहे. त्या अभियानांतर्गत आज आम्ही प्रत्येक आमच्या मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सामूहिक नेत्या पदाधिकाऱ्यांनी अर्धसंकल्प समोर बघितला. त्याविषयी आपलं जे मत आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अभियान सुरू झाले आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई हे या अभियानाचे जिल्हा संयोजक आहेत आहेत. व्यापारी आघाडीचे उद्योग आघाडीचे संयोजक सुधीर झांट्ये हे जिल्ह्याचे सदस्य आहेत. त्याचबरोबर सगळे सदस्य जनतेपर्यंत हा अर्थसंकल्प पोहोचवण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करणार आहेत.
श्री. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग बारा वर्ष अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. या बारा वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये इतक्या तरतुदी या एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकास कसा पोहोचेल याचा विचार भाजपने केला आहे. आजचा अर्थसंकल्प आपण बघितला तर त्या अर्थसंकल्पामध्ये अध्यात्मिक क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्रावर भरीव तरतुदी आहेत. तसेच आरोग्य क्षेत्र, लघु उद्योग, कृषी, क्रीडा, इलेकट्रोनिक्स, या क्षेत्रासोबत महिला आणि युवा वर्गावर फोकस करण्यात आला आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये आतापर्यंत 25 कोटी लोक ही दारिद्र्यरेषेच्या वरती आले आहेत. खरंतर अर्थसंकल्पाचे हेच यश आहे की दारिद्र रेषेखालील 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम या आजपर्यंतच्या अर्थसंकल्पांनी केले आहे आत्मनिर्भर या विषयावर सुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारच्या तरतुदी आहेत.
श्री. सावंत पुढे म्हणाले, सरकारने किसान सन्मान सारखी योजना काढली आहे. खत आणि बाकी सगळ्या गोष्टींवर सबसिडी दिल्या आहेत. कर्जाच्या काही योजना आणलेल्या आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यावर या अर्थसंकल्पाचा भर आहे. आर्थिक विकास दरात सुद्धा वाढ हे भारताचे या सगळ्या अर्थसंकल्पातलं पहिलं कर्तव्य आहे. आरोग्याच्या बाबतीत भारताला बायोफार्मा हब बनवण्यासाठी दहा हजार कोटीची तरतूद केलेली आहे. त्याजोगे आरोग्य क्षेत्रामध्ये बायो फर्माचा हब होईल आणि आरोग्यातल्या संशोधन या विषयावर मोठं काम करता येईल. यासाठी ही मोठी तरतूद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर, मधुमेह यावरील उपचाराचा खर्च आहे तो आजपर्यंत बराच होत होता. जेनेरिक मेडिसिनच्या साह्याने तो कमी कमी करत आणलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये यावरची सगळी औषधं स्वस्त करण्याचं एक अभिवचन सरकारने दिलेल आहे.
पुढील पाच वर्षांमध्ये वाहतुकीची कोंडी आणि होणारे अपघात या सगळ्या विषयावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय जलमार्ग उभारण्याचं पण काम हाती घेण्यात येणार आहे. हा सुद्धा नागरिकांना दिलासा देण्याचा विषय आहे. महाराष्ट्र बाबत मुंबई पुणे हाय स्पीड रेल कॉरिडोर तयार करण्याचे एक मोठं आश्वासन या सगळ्यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय की आज आपल्याला तज्ञ डॉक्टरांची कमतरता भासते त्यामुळे सरकारने आयुष्यमान योजना आणली. पैशाची तरतूद केली. तरी ग्रामीण भागामध्ये विशेषता तज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे एकीकडे आपण योजना देतो पैसे देतो त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरवर भर देण्यात आला आहे. मुलींसाठी ग्रामीण भागात हॉस्टेल उभारण्यात येणार आहे. खेलो इंडियाच्या मिशनच्या माध्यमातून अजून एक क्रीडा क्षेत्रातल्या सुधारणांवर भर देण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पाचा कोकणला फायदा
नारळ आणि काजू उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये भरपूर होतं. त्यामुळे कोकणसाठी नारळ, काजू, मासे, पर्यटन आणि पशुपालन अशा गोष्टींवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे, नारळ आणि काजू यांचे संवर्धन करण्यासाठी विशेष योजना राबविली जाणार आहे. त्याचबरोबर मत्स्यपालनसाठी ५०० अमृत जलाशय उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही योजनांचा लाभ आपल्या जिल्ह्याला चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. येत्या काही वर्षांमध्ये पशुपालनासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सहकार क्षेत्र असेल आणि बँका वगैरे असतील तर पशुपालनाचा विषय या आधी घेतला आहे. पशुपालनासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल. तसेच महिलांसाठी ग्रामीण भागामध्ये शी-मार्ट उभारण्यात येणार आहेत.
अध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा या अर्थसंकल्पात चांगली तरतूद आहे. देशातील ५०० मंदिरांसाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर पर्यटनाच्या दुर्ष्टीने देखील या अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. जी काही वीस जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत त्याठिकाणी दहा हजार गाईड तयार करण्यात येणार आहेत. त्याचा फायदा आपल्या जिल्ह्याला सुद्धा होणार आहे. असे प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.










