
सावंतवाडी : शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई उभारण्यासाठी फुल, भाजी आणि मसाला पदार्थ विक्रेत्यांनी शब्द दिल्याप्रमाणे गणेशचतुर्थी सणानंतर प्रशासनास जागा खाली करून देण्यासाठी सुरूवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून संत गाडगेबाबा भाजी मंडई उभारण्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याच भुमिपूजन झालं असून लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. संत गाडगेबाबा भाजी मंडईत बसणाऱ्या व्यापाऱ्यांनी नव्या जागेत बसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नव्याने मार्केट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऐन चतुर्थीच्या काळात आपल्याला बसण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. तसेच चतुर्थीनंतर आम्ही स्वतः ही जागा सोडू असा विश्वास दिला होता. त्यानुसार त्यांनी आपली जागा पालिका प्रशासनाला खाली करून दिली आहे.
सावंतवाडी पालिकेची संत गाडगेबाबा भाजी मंडई पुन्हा एकदा नव्याने बांधली जात आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपलब्ध करून दिला आहे. याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर तेथील व्यवसायिकांना हलविण्या संदर्भात कार्यवाही सुरू होती. परंतु ऐन चतुर्थीच्या काळात पालिका प्रशासनाने तशाप्रकारे निर्णय घेतल्यामुळे व्यावसायिकात नाराजी होती. यात भाजी, फळ, मसाला विक्रेत्यांचा समावेश होता. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पालिका प्रशासनाची भेट घेऊन चतुर्थी काळात आपल्याला मुभा देण्यात यावी अशी मागणी केली होती. अन्यथा त्याच जागेत बसू असा इशारा दिला होता. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी चतुर्थीपर्यंत त्यांना बसण्यासाठी मुभा दिली होती. दरम्यान चतुर्थीचा काळ संपल्याने विक्रेत्यांनी नव्या जागेत जाण्यास सुरुवात केली. सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई लवकरच उभारली जावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.