
वेंगुर्ला : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या वतीने रोटरी रिव्हेन्यू डिस्ट्रीक्ट म्हणजेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबच्या क्रीडा स्पर्धा यंदा वेंगुर्ला नगरीत दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०२२ रोजी वेंगुर्ले कॅम्प मैदान येथे संपन्न होत आहेत. क्रीडा स्पर्धेत दोन्ही जिल्ह्यामधून सुमारे १५० हून अधिक रोटेरियन क्रीडापटू उपस्थित राहणार असून सदर स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबलटेनिस, कॅरम, बुद्धिबळ व ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेचा एक भाग म्हणून स्पर्धेत दिले जाणारे चषक, जर्सी आणि टोपी यांचे अनावरण रोटरी प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते रोटरी भवन, सावंतवाडी येथे करण्यात आले.
या क्रीडा स्पर्धेचा उद्धाटन सोहळा शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी माजी प्रांतपाल, रो. अविनाश पोतदार, भावी प्रांतपाल रो. शरद पै यांचे हस्ते संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कॉन्फरन्स चेअरमन रो. अशोक नाईक, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू शिरीष गोगटे, सहाय्यक प्रांतपाल रो. दीपक बेलवलकर, सहाय्यक प्रांतपाल रो. नीता गोवेकर व रो. राजेश रेड्डीज हे उपस्थित राहणार आहेत.
समारंभाचे बक्षीस वितरण माजी प्रांतपाल रो. गौरेश धोंड यांचे हस्ते होणार असून सदर समारंभासाठी डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी रो. राजेश साळगांवकर यांच्यासमवेत गोवा राज्याचे रणजी क्रिकेटपटू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत रोटेरीयन क्रीडापटू यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांच्याही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व रोटेरीयन तसेच क्रीडा रसिकांनी या स्पर्धांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या वतीने करण्यात आले आहे.