
दोडामार्ग : रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग यांच्या माध्यमातून भारतमातेच्या भूमिपुत्रांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने ऐतिहासिक साहसी खेळांना पुनरुज्जीवन मिळावे यासाठी मल्लखांब गृप हुंबरणे यांची मल्लखांब प्रात्यक्षिके तर SSS 1+ गृप बीडवाडी कणकवली यांनी लाठी काठी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी चिमुकल्यांचे सादरीकरण उपस्थितांना थक्क करून सोडणारे होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. Idial school of Music च्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, इशस्तवन आणि देशभक्तीपर गीते सादर केली. कु. सर्वज्ञ वराडकर आणि कु. आदेश खानोलकर यांच्या एकपात्री अभिनयाने इतिहास काळात डोकावल्यासारखे वाटले. कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत बाबल अल्मेडा रेस्क्यु टिम, वनश्री फाऊंडेशन, नवीद हेरेकर, नाट्य कलाकार कृष्णा देसाई आणि दोडामार्ग पोलिस ठाणे PI निसर्ग ओतारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. २५० ते ३०० शिवप्रेमी आणि दुर्ग सेवाकांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नूतन विद्यालय कळणे चे सहायक शिक्षक उमेश देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर निसर्ग ओतारी यांनी सह्याद्री प्रतिष्ठान च्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. जिल्हा बॅंक संचालक गणपत देसाई, नूतन विद्यालय कळणे मुख्याध्यापक महेंद्र देसाई, कळणे सरपंच अजित देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष संजय देसाई, वनश्री फाऊंडेशन संस्थापक संजय सावंत, राष्ट्रीय पंच सोमनाथ गोंधळी सर या मान्यवरांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रशासक सिद्धू परब यांनी केले.