जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त 'आम्ही कटिबद्ध आहोत'ही थिम

22 मे ते 28 मे या कालावधीत जनजागृती सप्ताह राबविणार
Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 22, 2023 18:58 PM
views 125  views

 जागतिक पातळीवर 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त 'आम्ही कटिबद्ध आहोत' ही या सप्ताहाची थिम असणार आहे. या दिनाचे औचित्य साधून ता. 22 मे ते 28 मे या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे.  अशी माहिती श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली. 

          मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी परंपरांमुळे मुली-महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन हा मासिक पाळी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे या पार्श्वभूमीवर या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात रॅली, चर्चासत्रे, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिक, प्रबोधन  उपक्रमांद्वारे जनजागृती सप्ताह जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर राबविण्यात येणार आहे.

          या अनुषंगाने महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबींना केंद्रस्थानी ठेवून जनजागृती केली जाणार आहे. तरी सर्व ग्रामपंचायत मधील आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका,  महिला बचत गट यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात या सप्ताह निमित्त 'मासिक पाळी व्यवस्थापन व आरोग्याची काळजी' या विषयावर माहिती देऊन जनजागृती करावी असे आवाहन श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली.