
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग व शिक्षक समिती शाखा कणकवली यांचे वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांचे महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री पद व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले बद्दल संघटनेच्या वतीने राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभाग अत्यंत संथगतीने कारभार हाकत आहे,शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत प्राथमिक शिक्षण विभाग गांभीर्याने कार्यवाही करताना दिसत नाही. प्राथमिक शिक्षकांच्या विविध पदोन्नती होणे आवश्यक आहे परंतु केंद्रप्रमुख, विषय शिक्षक या पदोन्नत्या बऱ्याच वर्षापासून रखडून ठेवल्या आहेत. अलीकडेच विस्तार अधिकारी पदोन्नती करण्यात आली परंतु त्यातही 50% पदे रिक्त आहेत प्राथमिक शिक्षकांच्या पगाराबाबत प्रशासन उदासीन असून एक ते पाच तारीख च्या दरम्यान पगार करणे अनिवार्य असताना प्रशासन कधीही त्याचा अवलंब करत नाही. बारा वर्षानंतर शिक्षकांना मिळणारी वरिष्ठ वेतनश्रेणी चे प्रस्ताव मागील दोन वर्षापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याबाबतही कार्यवाही रखडलेली आहे. शिक्षकांचे निवड श्रेणी प्रस्ताव सुद्धा प्रतीक्षेत आहेत. हिंदी मराठी भाषा सूट प्रस्ताव संगणक प्रशिक्षण प्रस्ताव यावर दोन ते तीन वर्षे कार्यवाही झालेली नाही. निवृत्त शिक्षकांना निवृत्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. आदर्श शिक्षक वेतनश्रेणी संदर्भात शासन निर्णय होऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे संच मान्यता करण्यात आली आहे ,सदर संच मान्यता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अन्यायकारक असून त्याची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग सुमारे 90% बंद होणार आहेत. वरील प्रश्नांच्या अनुषंगाने शिक्षकांना दिलासा मिळणे आवश्यक असल्याने पालकमंत्री या नात्याने या प्रश्न लक्ष देण्याची विनंती प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मंत्री नितेश राणे यांना करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, राज्य कार्यकारीणी सदस्य सचिन मदने, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर, कणकवली तालुका अध्यक्ष टोनी म्हापसेकर, कणकवली सचिव संतोष कांबळे, कणकवली पतपेढी संचालक श्रीकृष्ण कांबळी , सावंतवाडी तालुका अध्यक्ष समीर जाधव,जिल्हा उपाध्यक्ष अजय तांबे , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विनायक जाधव, माजी तालुका कोषाध्यक्ष संतोष राणे,जिल्हा विभागीय उपाध्यक्ष किशोर गोसावी, जिल्हा संघटक निलेश ठाकूर,कणकवली उपाध्यक्ष राजेंद्र कडुलकर,केंद्र संघटक सचिन सावंत आदी उपस्थित होते.