
सावंतवाडी : सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी आपला रजा कालावधी संपण्यापूर्वी एक महिना आधीच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आज त्यांनी कामाला सुरुवात देखील केला आहे. आज उपजिल्हा रुग्णालयात आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते व नगराध्यक्षांच्या उपस्थितीत लिफ्टच लोकार्पण करण्यात आले. यानंतर वैद्यकीय अधिक्षकांनी त्यांचे रूग्णालयातील समस्यांकडे लक्ष वेधल.
उपजिल्हा रुग्णालयात आधुनिक यंत्रणा असूनही भुलतज्ञ, फिजिशियन नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना तातडीची सेवा देणे गैरसोयीचे होते. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्याकडे केली. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्या, उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरली जातील असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. मात्र, मागच्या ४ महिन्यात परिस्थिती जैसे थेच राहिली. नागरिकांमधून याबाबत सवाल उपस्थित केले जाऊ लागले. यातच उपजिल्हा रुग्णालय आलेल्या नगराध्यक्षांचे लक्ष वैद्यकीय अधिक्षकांनी वेधले आहे. सर्व कर्मचारी, डॉक्टर जीव तोडून काम करत आहेत. परंतु, भुलतज्ञ आणि पूर्णवेळ फिजिशन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना दुसरीकडे पाठवावे लागत असल्याची खंत वैद्यकीय अधिक्षकांनी व्यक्त केली. दरम्यान, याबाबत आपण प्रस्ताव द्या, वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून नक्कीच रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी दिले. यावेळी नगरसेविका निलम नाईक व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.











