
सावंतवाडी : १५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक मोती तलावाचा दगडी काठ इतिहास जमा होत आहे. या दगडी काठाची जागा सिमेंट कॉक्रीटच्या भिंतीनी घेतली आहे. संपूर्ण तलावापैकी फक्त अर्धा भाग हा दगडी असून तो देखिल खचत चालला आहे.
राजवाड्याच्या लेस्टर गेट समोरील कठड्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. तलावाच्या दोन ठिकाणी पाणी सोडण्यासाठी गेट उभारले गेले आहेत. त्यातील कोर्टाच्या भागात असणाऱ्या गेटशेजारील कठडा नादुरुस्त झाला होता. या कठड्याला भेगा पडल्यानं तो खचला होता. येत्या पावसात हा कठडा कोसळण्याची शक्यता होती. त्याचा फटका फुटपाथला बसला असता. त्यामुळे या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या संरक्षक भिंतींच्या बांधकामासाठी ८० लाख मंजूर करत निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे काम जलदगतीने पूर्ण केलं जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिली आहे. तर या ठिकाणच्या गेटच्या डागडुजी संदर्भात विचारलं असता ते काम नगरपरिषद बांधकाम विभागाकडे असल्याचं त्यांनी सांगितलं.
याबाबत न.प. बांधकाम अभियंता शिवप्रसाद कुडपकर यांच्याशी संपर्क साधला असता हे गेट सुस्थितीत आहे. परंतु, पाणी जाण्यासाठीची अंडरग्राऊंड वाट आहे त्याठिकाणी अडथळा निर्माण होत आहे. याबाबत तज्ञांच मार्गदर्शन घेऊन ते काम केलं जाईल अस ते म्हणाले. शिव उद्यान समोरील संरक्षक भिंतीसाठी १ कोटी १३ लाख ७४ हजार एवढा खर्च करण्यात आला. या ठिकाणी तिनमुशीकढील थोडंसं काम शिल्लक राहिले आहे. तर राजवाड्यासमोरील संरक्षक कठड्यासाठी ८० लाख असे या वर्षांत १ कोटी ९३ लाख एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. मोती तलावाची खरी ओळख असणाऱ्या दगडी काठाची जागा आता सिमेंट कॉक्रीटच्या भिंतीनं घेतली आहे. राजवाडा ते शिव उद्यान पर्यंत कॉक्रीटचा काठ बनला असून दगडी काठात लपलेल तलावाच सौंदर्य लुप्त पावल आहे.