
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घनकचरा प्रकल्पावरून वातावरण तापलेलं पहायला मिळालं. घनकचरा प्रकल्प करायचा असेल तर नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेमध्ये करा अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी केली तर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी घनकचरा प्रकल्प मच्छी मार्केटमध्ये उभारण्यात यावा अशी मागणी केली या विषयावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले. अखेर हा विषय तीन महिन्यानंतर पुन्हा पटलावर घेतला जाईल असे नगराध्यक्षा सौ अक्षता खटावकर यांनी सांगितले. आणि हा विषय शांत केला.
कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अक्षता खटावकर, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी अरविंद नातू, महाविकास आघाडी गटनेता मंदार शिरसाट, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, महाविकास आघाडी नगरसेविका आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, सई काळप, नगरसेवक उदय मांजरेकर, भाजपा नगरसेविका सौ संध्या तेरसे, प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, नगरसेवक निलेश परब, अभी गावडे, ॲड. राजीव कुडाळकर आदी उपस्थित होते.
या सर्वसाधारण सभेमध्ये घनकचरा प्रकल्पावरून सत्ताधारी व विरोधक यांच्या खडाजंगी झाली. घनकचरा प्रकल्पा संदर्भात सभेमध्ये विषय मांडण्यात आला एका कंपनीने भाडेतत्त्वावर मच्छी मार्केट येथील जागा या प्रकल्पासाठी मागितली त्यासाठी नगरपंचायत व त्या कंपनीमध्ये करार करावा की नको या संदर्भात विचारणा करण्यात आल्यावर मच्छी मार्केट येथील नगरसेविका नैना मांजरेकर यांनी या विषयाला विरोध दर्शविला मुळात या प्रकल्पामुळे या भागातील लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागणार आहे त्यानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी विरोध करून हा प्रकल्प नगरपंचायतीने घेतलेल्या एमआयडीसी किंवा दत्तनगर येथील जागेमध्ये उभारण्यात यावा अशी मागणी केली यामध्ये महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवून त्या ठिकाणच्या लोकांचा विरोध आहे त्यामुळे असा प्रकल्प त्या ठिकाणी नको आणि यामध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली अखेर हा विषय तीन महिन्यानंतर पटलावर घेण्याचे ठरले.
तसेच वेंगुर्लेकरवाडी येथील असलेल्या रस्त्यावरून सभेमध्ये खडाजंगी झाली हा रस्ता नगरपंचायतीच्या दप्तरी नोंद आहे. असे असताना या रस्त्याची निविदा का उघडली जात नाही. तीन सभांमध्ये हा विषय झाला. पण निविदा काही उघडली जात नाही. याला कारण काय असा सवाल भाजप नगरसेवक निलेश परब यांनी विचारल्यावर उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितले की या रस्त्याचा नकाशा बनलेला नाही तसेच जो करार झाला आहे त्यामध्ये कुठेही तत्कालीन ग्रामपंचायतीचा उल्लेख नाही त्यामुळे याचा निर्णय होत नाही तसेच कागदपत्रांची पडताळणी होत नाही तोपर्यंत हात रस्ता बनविण्यात येऊ नये अशी मागणी केली यामध्ये सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाले होते.