
चिपळूण : बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांची जागा घेत तब्बल २० वर्षे सांभाळ केलेल्या गोवळकोट येथील इमरान सय्यद व शाहिस्ता सय्यद या मुस्लिम दाम्पत्याने हिंदू मुलीचे रविवारी कन्यादान केले. हिंदू-मुस्लिम मित्रपरिवार, नातेवाईकांच्या साक्षीने झालेल्या प्रतिभा सैतवडेकर व रुपेश बिबवेकर यांच्या अनोख्या व आदर्शवत विवाह सोहळ्याची सध्या शहरासह तालुक्यात चर्चा रंगली आहे. अनेक आठवणी घेऊन माहेरी जाणाऱ्या मुलीचा पाठवणी वेळी अश्रूचा बांध फुटला. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
सध्या देशात अनेक प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या दोन धर्मात काही ठिकाणी वादाची ठिणगी पडत असतानाच येथे या सर्वाला छेद देणाऱ्या विवाह सोहळ्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. यातूनच अनेकजण सय्यद कुटुंबाचे भरभरुन कौतुक करीत आहेत. प्रतिभासह तिची अन्य चार भावंडे लहान असतानाच त्यांची आई सय्यद कुटुंबाकडे घरकाम करीत असे. त्यामुळे प्रतिभा व तिची भावंडेही याच घरात वावरत असत. तिचे वडील मोलमजुरी करायचे. मात्र २० वर्षांपूर्वी अचानक आई वडिलांचा मृत्यू झाला आणि ५ मुले पोरकी झाली. त्यामुळे भावंडात थोरली असलेली प्रतिमाही हादरली. मात्र तिला सावरण्याचे काम सय्यद कुटुंबाने केले. तिला आपल्या घरी ठेवत दोन बहिणींना शिक्षणासाठी दापोलीतील वसतिगृहात ठेवले. तर दोन भावांना अन्य नातेवाईक घेऊन गेले. वसतिगृहात ठेवलेल्या दोघींचीही हे कुटुंब काळजी घेत होते. असे असताना प्रतिभा मोठी झाल्याने तिच्या विवाहाची तयारी सय्यद कुटुंबाने सुरू केली होती. तिच्यासाठी चांगला मुलगा बघावा, असे त्यांनी आपल्या हिंदू मित्रांना सांगितले होते. यातूनच तिचा विवाह रुपेश याच्याशी ठरला.
हिंदू रितीरिवाजाप्रमाणे पहिल्यांदा साखरपुडा झाला. तर रविवारी पेढे येथील एका सभागृहात प्रतिभा आणि रुपेश यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. सय्यद कुटुंबाने प्रतिभाला लग्नासाठी लागणारे दागिने, आहेर, संसारोपयोगी भांडी अशा अनेक वस्तू भेट देऊन तिची पाठवण केली. मात्र हा कार्यक्रम होताना त्यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झाले. या अनोख्या विवाह सोहळ्याला दोन्ही धर्मातील मित्र, नातेवाईक, उपस्थित होते.
त्यांचे प्रेम न विसरण्यासारखे..
आई, वडील देवाघरी गेल्यानंतर मी पूर्णपणे खचली होते. ते दुःख पचवण्याएवढे माझे वयही नव्हते. मात्र अशा कठीण परिस्थितीत मला आणि माझ्या अन्य भावडांना सय्यद कुटुंबाने दिलेला मायेचा आधार, लेक म्हणून घेतलेली काळजी, पार पाडलेली सर्व कर्तव्य हे सारे न विसरण्यासारखे आहे.
प्रतिभा सैतवडेकर, नववधू