
देवगड : देवगड तालुक्यातील मणचे गावात 'काळतोंड्या' हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाची प्रजाती असणारा साप सापडला आहे. याला इंग्लीश मध्ये Dumeril’s Black-headed Snake या नावाने ओळखले जाते.काळतोंड्या ही एक दुर्मिळ प्रजाती चा साप असल्याचे बोलले जात आह.या दुर्मिळ सापाच्या उपस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.हा साप फणसगाव येथील समीर प्रकाश नारकर यांना मणचे गावातील व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ आढळून आला. त्यांना वन्यजीवनिरीक्षणाची आवड आहे.साप दिसताच त्यांनी तत्काळ त्या सापाचे व्हिडिओ आणि फोटो घेतले आणि योग्य ओळख पटविण्यासाठी चिंदर गावचे वन्यजीव अभ्यासक व सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांच्याशी संपर्क साधला. स्वप्नील गोसावी यांनी या सापाची ‘काळतोंड्या’ (Dumeril’s Black-headed Snake) अशी ओळख पटवली.
हा साप अंदाजे 25 ते 30 सेंटीमीटर लांबीचा असून, त्याच्या डोक्यावर काळया रंगाचा डाग असल्यामुळे स्थानिक भाषेत त्याला “काळतोंड्या” असे म्हणतात. हा साप बिनविषारी असून स्वभावाने लाजरा आहे. त्याचा वावर मुख्यतः दाट जंगल व गवताळ भागांमध्ये असतो. पाली, सापसुरळी हे त्याचं खाद्य आहे.ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारच कमी वेळा आढळून आलेली असून याबाबतचे नियमित नोंदवहीकरण देखील अत्यंत मर्यादित आहे.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, अशा दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन आणि त्यांच्याविषयीची जागरूकता ही काळाची गरज आहे.मणचे येथील परिसरातील हा साप सिंधुदुर्गातील जैवविविधतेसाठी एक महत्त्वाची नोंद असणार आहे.