
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या सह्यांचा वापर करून १३ बिले काढण्यात आल्याच्या प्रकरणी दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आक्रमक झाली असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
फेब्रुवारी महिन्यात बांधकाम विभागातील १३ बिले कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट सह्यांद्वारे काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र अद्यापही कारवाई न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
या वेळी एवढा मोठा गैरप्रकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय होऊ शकत नसल्याचा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत दालनातून हलणार नसल्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी यावेळी प्रकरणातील कार्यवाहीची माहिती दिली. चौकशी अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी तीन वेळा पोलिस ठाण्यात भेट दिली होती. पोलिसांकडून काही आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याने प्रक्रियेला विलंब झाला. दरम्यान ते रजेवर गेले होते. आता ते पुन्हा हजर झाले असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दालन सोडले.
"या प्रकरणात कोणालाही वाचविण्याचा प्रश्न नाही. चौकशीत जेवढे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल," असे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवाजी घोगळे, अनंत पिळणकर, रुपेश जाधव, उत्तम सरफदार आदी उपस्थित होते.










