लोकसभेला महायुतीत शिवसेनेचाच उमेदवार असावा : सचिन वालावलकर

वेंगुर्लेतील कोस्टेल भागासाठी शिवसेना तालुकाप्रमुखपदी काशिनाथ नार्वेकर
Edited by: दिपेश परब
Published on: March 20, 2024 13:56 PM
views 426  views

वेंगुर्ले : आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचाच  उमेदवार असावा असा आग्रह आपला पक्षश्रेष्ठींकडे आहे. महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार देण्यात येईल त्याचा सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते एकमताने काम करतील असा विश्वास शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केला. 

   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुका शिवसेनेची आढावा बैठक आज बुधवारी (२० मार्च) रोजी येथील सप्तसागर अपार्टमेंट मधील शिवसेना शाखेत संपन्न झाली. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी, महिला तालुका संघटक प्राची नाईक, युवासेना शहर प्रमुख संतोष परब, विभाग प्रमुख संजय परब, कौशिक परब, कोस्टल भागाचे तालुका प्रमुख काशिनाथ नार्वेकर, शिरोडा माजी उपसरपंच पेडणेकर, शीतल साळगावकर, मितेश परब यांच्यासाहित इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    दरम्यान यावेळी तालुक्यातील किनारपट्टी भागासाठी शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काशिनाथ नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. काशिनाथ नार्वेकर यांच्यावर तालुक्यातील ज्या गावांना किनारपट्टी लाभली आहे त्या गावात संघटनात्मक बांधणी करून त्यांच्या काही समस्या असतील किंवा त्या भागात विकास कामे सुचवण्याच्या दृष्टीने जबाबदारी देण्यात आल्याचे सचिन वालावलकर यांनी सांगितले. 

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ७ प्रमुख पदाधिकारी यांची कमिटी तयार करून तालुक्यातील विविध कार्यकर्त्यांची पदावर नियुक्ती करण्यात येणार असून तसेच पुढील आठवड्यात संघनात्मक मजबुतीच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येतील असेही यावेळी श्री वालावलकर म्हणाले. यावेळी सुनील डुबळे, बाळा दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आभार व्यक्त केले.