
सावंतवाडी : भाजी मंडईबाबत अलीकडे केसरकरांनी घेतलेल्या बैठकीबाबत आपण समाधानी नाही. सर्वपक्षांना विश्वासात घेऊन व्यापाऱ्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. केसरकरांची एकाधिकारीशाही चालणार नाही, अशी रोखठोक भूमिका आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मांडली. दरम्यान शहरातील आपल्या काळात सुरू झालेली सेल्फी पॉइंट व शिवाजी स्मारक यांची काम केवळ मुख्याधिकारी यांच्यामुळे रखडली आहेत. यासंदर्भात आपण लवकरच पालकमंत्र्यांचे लक्ष वेधू, असेही परब यांनी यावेळी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी,दिलीप भालेकर, आदी उपस्थित होते.
राज्यात भाजप आणि शिंदे गट एकत्र काम करत असताना सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे आहे. सावंतवाडी नगरपरिषद भाजी मंडई संदर्भात केसरकर हे एकाधिकारशाही चालवत आहे. आपण नगराध्यक्ष असताना भाजी मंडईचा आराखडा मंजूर झाला होता, त्यामुळे या संदर्भात बैठक घेताना केसरकर यांनी आपल्यासह अन्य काहींना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र तसे न करता केसरकर यांनी बैठक घेऊन परस्पर निर्णय घेतले. त्यामुळे या बैठकी संदर्भात आपण समाधानी नाही. मंडई बाबत व्यापाऱ्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, यासाठी आपण आजही आग्रही आहे. त्यांचे योग्य पुनर्वसन करूनच भूमिपूजनाचा घाट घालण्यात यावा.
तर दुसरीकडे शहरातील रखडलेली कामे लक्षात घेता याला सर्वस्वी मुख्याधिकारीच जबाबदार आहेत, असे सांगून ते म्हणाले, आपल्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच सेल्फी पॉइंट ही कामे सुरू होऊनही पूर्णत्वास आली नाही तसेच बॅ.नाथ पै सभागृह नुतनीकरण काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. एकूणच याचा फटका नागरिकांना बसत आहे. त्याची आपल्याला खंत असून लवकरच आपण या संदर्भात पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सावंतवाडी शहरातील विविध कामांसाठी 7 कोटी 34 लाख रुपये मंजूर झाले असून आपल्या कार्यकाळात या कामांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रित मंत्री नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सततच्या पुराव्यामुळे हे यश आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब आज येथे दिली.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राच्या ठिकाणी सभागृह उभारणे, डोंगरे पाणंद येथे बहुउद्देशीय सभागृह उभारणे, बाहेरचा वाडा येथे बहुउद्देशीय सभागृह उभारणे जिमखाना मैदान सपाटीकरण करण्याबरोबर रस्त्यांची डांबरीकरण अशी विविध कामे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे या कामाचा फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे, असेही परब यावेळी बोलताना सांगितले.यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी,दिलीप भालेकर, आदी उपस्थित होते.