कोकणातील ऐतिहासिक किल्ल्यांची वाताहत

दुर्गसेवक प्रणव मापुस्कर यांनी शासनाचे वेधले लक्ष
Edited by: मनोज पवार
Published on: July 25, 2025 11:24 AM
views 95  views

खेड : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील ऐतिहासिक किल्ल्यांची सध्याची अवस्था पाहिली तर काळजाचा ठोका चुकतो. रसाळगड, महिपतगड, सुमारगड यांसारखे दुर्ग पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ढासळत आहेत. कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष संवर्धनाच्या कामांचे फार्स सुरु आहे. ही दुर्दैवी परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत,” अशा शब्दांत दुर्गसेवक श्री. प्रणव मापुस्कर यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.

खेड तालुक्यातील रसाळगड हा किल्ला २०२३ पासून राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला असला, तरी आजवर कोणतेही ठोस संवर्धनाचे काम झाले नसल्याची खंत इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि सुमारे पाच एकर क्षेत्रफळ असलेला हा दुर्ग, आजही शिवकालीन मंदिर, दीपमाळ, धान्यकोठार, बालेकिल्ला, मायाबा काळकाई मंदिर, आग्रेकालीन समाधी, प्राचीन गणेशशिल्प, भुयारी रचना आदी ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. मात्र या सर्व वास्तूंची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे.


विशेष म्हणजे दोन-तीन वर्षांपूर्वी धान्यकोठाराच्या दक्षिणेकडील भिंतीचा मोठा भाग कोसळला, तरीही आजतागायत त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. “गेल्या वीस वर्षांत कोट्यवधी रुपयांचे कामे दाखवण्यात आली, पण प्रत्यक्ष गड पाहिला तर हा निधी नेमका खर्ची पडला तरी कुठे, हा प्रश्न प्रकर्षाने निर्माण होतो,” असा सवाल मापुस्कर यांनी उपस्थित केला आहे.

सुमारगड आणि महिपतगड हे किल्लेही खेड तालुक्यात असून अजूनही ‘अपरिचित’ या वर्गवारीत येतात. महिपतगडाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरु आहे, मात्र त्यासाठी प्रशासनाची गती अत्यंत मंद आहे. पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी हे दुर्ग आजही आकर्षणाचे केंद्र आहेत, मात्र पुरातत्त्व विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंची माती होत असल्याची खंत मापुस्कर व्यक्त करतात.

ते पुढे म्हणाले, “पुरातत्त्व विभाग केवळ कागदावर योजना आखतो, प्रत्यक्षात कामाच्या नावाखाली दर्याहीन कारभार सुरू आहे. निधीचा वापर गडाचे वैभव टिकवण्यासाठी नाही तर केवळ दाखवण्यासाठी होत असल्याचा संशय वाटावा अशी परिस्थिती आहे.”

भविष्यात या गडांचा पूर्णपणे नाश होऊन इथे कधी किल्ला होता का, असा प्रश्न उद्भवण्याची भीती व्यक्त करत मापुस्कर यांनी ठणकावून सांगितले – “छत्रपतींच्या गडांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. केवळ पर्यटनाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा इतिहासाचा सन्मान ठेवत गडांचे खरे संवर्धन व्हावे हीच आमची मागणी आहे.”

“जय शिवराय, जय भवानी” या गर्जनेसह दुर्गसेवक श्री. प्रणव मापुस्कर यांनी शासन, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक प्रशासन यांना ठोस कृती करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. इतिहासप्रेमींनी त्यांच्या या मागणीला पाठिंबा देत संवर्धन चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याची तयारी दर्शविली आहे.