
दोडामार्ग : धुवांधार पडणाऱ्या पावसामुळे वझरे तळेखोल विर्डी मार्गावरील हळदीचा गुंडा येथील येथील नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरु होते. यासाठी पुलाच्या बाजूने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला होता. बुधवार व गुरुवारी दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे पर्यायी मार्गच वाहून गेल्याची धक्का दायक घटना गुरुवारी दुपारी घडली.
वझरे ते तळेखोल विर्डी गावांना जोडणारा वझरे येथे हळदीचा गुंडा येथे नवीन पूल बांधण्याचे काम सुरु होते. पावसाळ्यापूर्वी पुलाच्या बाधकामाला सुरवात करण्यात आली होती. त्यामुळे तळेखोल, विर्डी, आयी या गावात जाण्यासाठी पुलाच्या बाजूने दुसरा पर्यायी रस्ता काढण्यात आला होता. अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसाने त्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहून लागले. म्हणता म्हणता तो पर्यायी रस्ताच वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला.
तळेखोल, विर्डी या गावांचा संपर्क तुटल्याने या गावातील लोकांचे मोठे हाल झाले आहेत. बाजारात व तालुक्याच्या ठिकाणी आदी कामंसाठी ये - जा करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झालेत. तसेच तळेखोल विर्डी गावातून तालुक्याच्या ठिकाणी आलेल्यांना नागरिकांना पुलाच्या दुसऱ्या बाजूला अडकून पडावे लागले. सायंकाळी उशिरा पर्यंत पाणी आटोक्यात आले नव्हते.