फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात भूमिपुत्रांचे मोठे योगदान ! अजयकुमार सर्वगोड.
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 17, 2023 16:15 PM
views 306  views

कणकवली: आमदार नितेश राणे यांनी सहविचार सभा घेतल्यानंतर, कित्येक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या फोंडाघाट बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण-गटार काम सुरू करण्यासाठी,पेठेतील रस्त्यालगतच्या दुकानदार- ग्रामस्थ- मालकांची बैठक राधाकृष्ण मंदिर मध्ये पार पडली. यावेळी सरपंच संजना आग्रे, राजन चीके, जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांचे सह, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता के.के.प्रभू, शाखा अभियंता राहुल पवार इत्यादी उपस्थित होते. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थांनी रस्ता रुंदीकरण व्हावे अशी मागणी केली या बैठकीचे आग्रे यांनी प्रास्ताविकामध्ये, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करताना कोणाचीही अडचण अथवा हरकत नको यासाठी, किंवा लगतच्या मालकांची काही समस्या असल्यास त्या त्यांनी मांडाव्यात असे आवाहन केले.गावात सदैव ट्रॅफिक जाम होत असल्याने, व त्याचा त्रास पर्यटकांसह सर्वांनाच होत असल्यामुळे, व्यवसाय वृद्धी आणि गावाच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होत असल्याचे सांगून, रस्ता रुंदीकरण करताना हा राज्य मार्ग असल्याने कोणालाही नुकसान भरपाई मिळणार नाही,असे राजन चीके यांनी स्पष्ट केले.


कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी हा पारंपारिक रस्ता असल्याने, सर्वांनी या कामास सहमती देऊन आपले दातृत्व दाखवावे. यासाठी नुकसान भरपाईची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगितले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यात्रेचे उदाहरण देताना, सिंधुदुर्ग भूमिपुत्रांनी या देशाला विकास कामात त्याग करून मोठे योगदान दिले आहे. कायद्याचा किस न काढता गावच्या सर्वांगीण विकासात सहभागी व्हा.आपल्या जिल्ह्याला पर्यटनाशिवाय तरणोपाय नाही,त्यामुळे पर्यटकांच्या माध्यमातून व्यवसाय मोठा करण्यासाठी आणि या ऐतिहासिक बाजारपेठेचे मोल जपण्यासाठी थोडा त्याग स्वीकारून स्वतःसह गावाला प्रतिष्ठा मिळवून द्या,असे कळकळीचे आवाहन केले.


यावेळी उपस्थित सुमारे ९० टक्के लोकांनी या कामास सहमती देऊन विरोध असणाऱ्यांचे काम तसेच ठेवावे, आणि काम शून्य किलोमीटर पासूनच सुरू करावे असे सुचविले. यावेळी अनिल पटेल, केदार रेवडेकर,प्रसाद पारकर, अनिल बांदिवडेकर, संतोष टक्के, चंदू पारकर, पिंटू पटेल यांनी आपली संमिश्र परखड मते मांडली. ते म्हणाले भूसंपादन विभाग- ठेकेदार यांच्या अनुपस्थितीत, पारंपारिक रस्ता इत्यादी माहिती सांगून आपण आमच्यातच मतमतांतरे चा वाद निर्माण करीत आहात. संपूर्ण जिल्ह्यात गावातील या रस्त्या एवढा मोठा रस्ता कुठल्याही पेठेत नाही. मात्र रस्त्यावरील गाड्या- वाहने- हॉकर इत्यादीमुळे वाहतुकीला खोळंबा होतो. यावर पर्याय न काढता, बाजारपेठेतील घरेच पाडून रुंदीकरणाचा अट्टाहास होत आहे. अर्थात कोणाचाही रस्ता रुंदीकरणाला विरोध नसल्याचे सांगून अधिकृत बांधकाम पाडल्यास त्याची भरपाई द्यावी. तसा अहवाल सादर करून टेंडर मध्ये दुरुस्ती करावी,असे स्पष्ट करण्यात आले.


वस्तुत्तः यापूर्वीच हा रस्ता भूसंपादन विभागाकडे वर्ग करून, त्याची हद्द लगतच्या मालकांना कळविणे आवश्यक होते. म्हणजे रुंदीकरणाचे अंतर स्पष्ट झाले असते.मात्र पारंपारिक रस्ता हा भोगले यांचे घर व एस.टी. स्टँडच्या मागून, जुना बाजार असा असताना,बाजारपेठेतील रस्त्याबाबत दिशाभूल केली जात असल्याचे आक्षेपार्थिनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे रुंदीकरण सर्वसंमत लोकांचे व्हावे व ज्यांचे आक्षेप आहेत,जे उध्वस्त होत आहेत त्यांना भरपाई मिळेपर्यंत रस्ता स्थगित ठेवावा. मात्र शून्य किलोमीटर पासूनचे रस्ता रुंदीकरण व गटार कामाला तातडीने सुरुवात करावी, असे मत समर्थकांनी यावेळी मांडले. शेवटी गदारोळातच बैठक आवरती घेण्यात आली. या बैठकीला बाजारपेठेतील दुकानदार- घरमालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते…….