
मालवण : मालवणसह जिल्हाभरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. हवामान विभागानेही जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. कणकवली तालुक्यातील गडनदीच्या पाण्याची पातळी 35 मिटर झाली असून धोक्याची पातळी 37.920 मिटर आहे. पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने कणकवली आणि मालवण तालुक्यातील खाडी किनारच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
या गावांना सावधानतेचा इशारा
जिल्ह्यात पावसाने सध्या हाहाकार माजवला असून सतत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. कणकवली येथील गडनदीची पाण्याची पातळी 35 मिटर झाली असून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मालवण तालुक्यातील मसुरे, मर्डे बांदिवडे, चिंदर, माळगाव, बागायत आणि कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे, जानवली, फणसनगर या गावातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून ये जा करू नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणा-या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी या बाबत सतर्कता बाळगावी.
मालवण तालुक्यातील मसुरे, मर्डे, बांदिवडे, चिंदर, माळगाव, बागायत आणि कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे, जानवली, फणसनगर या ग्रामपंचायतीनी सखल भागात राहणा-या तसेच कच्च्या घरात राहणा- या व्यक्तीबाबत आवश्यक तो दक्षता घ्यावी. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास आवश्यकतेनुसार नागरिकाना स्थलांतरित करण्यात यावे. त्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांनी सुरक्षिततेसाठी शाळाची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पुलावर पाणी आल्यास पुलावरून वाहतूक करण्यात येऊ नये. आवश्यक वाटल्यास पुलाच्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला केल्या आहेत. १६ तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांच्या संपर्कात रहावे व त्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात, तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे.
विशेषतः पुरस्थिती निर्माण होवून त्याकरिता होडयांची आवश्यकता लागल्यास होड्या त्वरित उपलब्ध होतील या अनुषंगाने आवश्यक असे नियोजन तालुकास्तरावरून करण्यात यावे. पुराच्या पाण्याने झाडे उन्मळून पडल्यास तो बाजूला घेण्यासाठी आवश्यक कटर उपलब्ध करून ठेवावेत अशा प्रकारच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.