
वेंगुर्ला : म्हापण मध्ये जनतेची दिशाभूल करून धनशक्तीचा जोरावर मजुरीवर प्रचाराला माणसे घेऊन फिरणाऱ्यांना गावातील जनता मतपेटीतून उत्तर देईल अशी प्रतिक्रिया म्हापण सरपंच अभय ठाकूर यांनी दिली आहे.
म्हापण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री देवी सातेरी खवणेश्वर ग्रामविकास पॅनल म्हापण च्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत आहोत. गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन गेली पाच वर्षे आम्ही काम करत आहोत. या विकासकामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीत मतदारांकडे मते मागीतली आहेत. गावात गेली पाच वर्षे आम्ही पारदर्शक कारभार केला.
आम्हाला मिळत असलेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांकडून गावात मजुरीवर माणसे घेऊन प्रचार करण्याची वेळ आली आहे. प्रचाराच्या दरम्यान खोटा प्रचार त्यांनी केला. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नसून ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. त्यामुळे म्हापण मधील सुज्ञ जनता त्यांना मतपेटीतून योग्य उत्तर देईल असा विश्वास अभय ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.