
चिपळूण : तालुक्यातील पिंपळी येथील, दसतटी मार्गावरील जुना पूल नुकताच खचल्याने परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी खडपोली गाव, दसपटी, गाणे- खडपोली औद्योगिक वसाहत या भागांकडे जाण्यासाठी नागरिकांना पेढांबे-खडपोली मार्गे वळसा घ्यावा लागत आहे. मात्र, हा पर्यायी मार्ग अरुंद आणि धोकादायक असल्याने अवजड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याच्या प्रस्तावास शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी ठाम मागणी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे निवेदन दिले आहे.
सद्यस्थितीत हलक्या वाहनांची वाहतूक पिंपळी नाका–पेढांबे नाका–खडपोली तळेवाडी–खडपोली, कळंबस्ते–मोरवणे फाटा–दळवटणे मार्ग, तसेच वालोटी–वालोटी फाटा या पर्यायी मार्गाने सुरू आहे. मात्र, या दोन्ही मार्गांची सरासरी रुंदी केवळ ३.७५ मीटर असून काही ठिकाणी तीव्र वळणं असल्याने वाहतुकीत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी औद्योगिक वसाहतीकडे जाणारी अवजड वाहतूक थांबली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी सांगितले की, “औद्योगिक वसाहतीतील उद्योगधंदे, शेतकरी तसेच स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अत्यावश्यक आहे. शासनाने या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी.” या निवेदनामुळे नागरिकांत दिलासा निर्माण झाला असून, शासन तातडीने निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.