अरुणा प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्तांनी रोखले

प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम करु देणार नाही | प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 06, 2024 05:54 AM
views 405  views

वैभववाडी : हेत किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणातील प्रलंबित प्रश्न   पाटबंधारे विभागाने सोडविले नसल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी अरुणा धरणाच्या कालव्यासह अन्य कामे आज (ता.५) रोखले.धरणपरिसरात सुरू असलेले काम सकाळी ११ वा.पासून बंद पाडले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत,तोपर्यंत धरणाच्या संबंधित कोणतेही काम करु देणार नाही असा निर्धार धरणग्रस्तांनी केला आहे. 

अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील आखवणे येथील १६५ धरणग्रस्त कुटुंबांचे हेत किंजळीचा माळ येथे शासनाने पुनर्वसन केले आहे. सन २०१९ साली धरणाची घळभरणी करण्यासाठी युध्द पातळीवर पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी पुनर्वसनातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले होते. माञ पाच वर्षे होत आली तरी हेत किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणातील अनेक कामे अपूर्ण आहेत. येथील नळपाणी योजनेसाठी बांधण्यात आलेलंल्या  विहीरीचा ताबा पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्तांना मिळावा अशी मागणी केली जात आहे. माञ संबंधित विहीर ही प्रकल्पग्रस्तांसाठी नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जाते असं प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. जर ही विहीर पुनर्वसन गावठाणासाठी नाही तर या विहीरीवर करण्यात आलेला लाखो रुपयाचा निधी कसा काय खर्च करण्यात आला.

असा सवाल धरणग्रस्तांकडून केला जात आहे. तर पुनर्वसन गावठाणासाठी स्वतंत्र विहीर मारण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहे. माञ, तेही अद्याप पूर्ण झालेल नाही. नळपाणीयोजनेच्या वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे धरणग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. गेले आठ दिवस पुनर्वसन गावठाणातील नळयोजनेला पाणी आलेले नाही.तसेच पाञ लाभार्थ्यांना अद्याप भूखंड मिळालेले नाहीत. त्यांना भूखंड मिळावे. मिळालेल्या भूखंडाची ताबा पावती व सात बारा मिळावे. संरक्षक भिंत बांधण्यात यावी. स्मशानभूमी ही अंगणवाडीला लागून आहे. ती ५० फूट मागे घ्यावी. तसेच पुनर्वसन गावठाणातील अंगणवाडी चालु करावी. अशा मागण्यायासाठी येथील नागरिकांनी  जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यांना समस्याबाबत पञव्यवहार, निवेदने दिली. माञ प्रशासनाकडून हे प्रश्न मार्गी लागले नाहीत.याकडे  दुर्लक्ष केला जात आहे असा आरोप केला आहे.गेले पाच वर्षे या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे   संतप्त धरणग्रस्तांनी धरणाचे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत धरणाचे काम करु देणार नाही. असा इशाराही धरणग्रस्तांनी दिला आहे. यावेळी  माजी सरपंच सुरेश नागप, महादेव नागप,शिवाजी पडीलकर,सुनिल नागप, मानाजी घाग , परशुराम पडीलकर, विनोद नागप, विजय नागप, यांच्यासह किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील धरग्रस्त उपस्थिती होते.