
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत वन्य हत्तींच्या उपद्रव सुरूच आहे. हेवाळे बांबर्डे येथील शेतकरी विठ्ठल लक्ष्मण गवस यांच्या केळी - माड बागायतीचे काल बुधवारी रात्रीपासून मोठे नुकसान या हत्तींनी केले आहे.
गेल्याच महिन्यात विठ्ठल गवस यांच्या शेती बागायतीत याच हत्तींनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला होता. त्यावेळीही त्यांचे मोठे नुकसान केले होते. काल बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास हा हत्ती विठ्ठल गवस यांच्या बागायती दाखल होत त्याने त्यांचे नुकसान करण्यास सुरुवात केली. हा हत्ती जवळपास पहाटे ३ वाजेपर्यंत गवस यांच्याच बागायातीत धुडगूस घालत होता. या रानटी हत्तीने जवळपास दहा ते बारा माड व पन्नास केळींचे नुकसान केले. मागच्या डिसेंबर महिन्यात देखील अशाच प्रकारे गवस यांचे नुकसान या हत्तीने केले होते. वारंवार होत राहणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांना समोर उभा राहिला आहे.
कर्नाटकात ज्याप्रमाणे हत्ती पकड मोहीम राबविली गेली त्याप्रमाणे दोडामार्ग मध्ये का राबवित नाही आहेत असा सवाल देखील आता शेतकरी विचारात आहेत. त्यामुळे वनविभागाने या होणाऱ्या नुकसानीची जाणीवपूर्वक दखल घेऊन हत्तींचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.