देवगडात शिमगोत्सवाची धामधूम !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 22, 2024 14:57 PM
views 333  views

देवगड :  गणपती आणि शिमगोत्सव म्हणजेच होळी या दोन सणांचे वेड प्रत्येक मालवणी माणसाला असतेच. चाकरमानी खास होळीसाठी मुंबईवरून गावाला येत असतात. देवगडात या उत्सवाचं वेगळेपण पाहायला मिळेल.  

देवगड तालुक्यात आणि गाबीत समाजात शिमग्याचे पारंपारिक घुमाट, फाग आणि कोळीण नृत्याची पद्धत आहे. देवगड तालुक्यातील गाबीत समाजाची होळी, शिमग्याचे फाग आणि कोळीण नृत्य याला एक इतिहास आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर आरमारात देवगड तालुक्यातील अनेक गाबीत कुटुंबे स्वराज्याची सेवा करत होती.  या गाबीत समाजाच्या लोकांना एकजुटीने ठेवण्यासाठी आणि काही काळ मनोरंजन, धार्मिक, सामाजिक ऐकी टिकून राहावी म्हणून होळीसणासोबत सोंगे आणि कोळीण नृत्याची परंपरा सुरू करण्यात आली. आजतागायत देवगड तालुक्यातील गाबीत समाजात ही परंपरा चालू आहे. प्रत्येक रूढी परंपरेला ग्रहण लागते तसेच या परंपरेलाही ते लागलेच आहे. बऱ्याच गावातून तरुणांचा सहभाग कमी झाल्याने केवळ ही परंपरा उरकली जाते.  तरीही काही गावांनी ही परंपरा जागृत ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यात देवगडमध्ये, झाजमवाडी तळवडे, मळई, आनंदवाडी, गिर्ये, वानिवडे बांदेवाडी, विजयदुर्ग, तारामुंबरी,आंबेरी, मोंड, विरवाडी, कट्टा, मोर्वे, आडबंदर इथे आजही जोशात हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आणि या होळीच्या पारंपरेची ओळख करून देत आहे." घुमाट"हे एक खास फक्त होळीसाठी वापरले जाणारे तालवाद्य आहे. मडक्या सारख्या आकाराच्या परंतू दोन्ही बाजूस तोंडे असणाऱ्या मातीच्या भांड्याच्या एका बाजूस घोरपडीचे चामडे नरम करून, ताणून बसवलेले असते. दुसऱ्या बाजूने तोंड मोकळे असते.. 

" फाग" म्हणजे खास प्रकारची तीही फक्त घुमटावर एका विशिष्ट लयीत म्हणायची पारंपरिक, पौराणिक गाणी आहेत. "कोळीण " म्हणजे एक कुमारवयीन मुलगा स्त्री वेश घेऊन घुमाट आणि फागाच्या तालावर एक खास प्रकारचे नृत्य सादर करतो. पाच रात्री (रंगपंचमी पर्यंत) सतत रात्रभर हा नाच चालतो. अर्जुनाने घेतलेल्या "बृहन्नडा" रुपाशी याचा संदर्भ असावा असे वाटते.  

पहिल्या दिवशी, म्हणजेच होळीच्या आदल्या रात्री बारा वाडीची होळी,आधीपासून टेहेळणी करून ठेवलेले , आंबाचेझाड तोडून मिरवत,देवगड मधील प्रत्येक गावा गावात  देवळात आणली जाते,हे झाड वाहून आणताना थोडी गंमत जंमत चालू असते.. रस्सीखेचच्या खेळाप्रमाणे हे झाड वाहून आणणारे पुढचे आणि मागचे तरुण एकमेकांना खेचून ताकद आजमावत हे झाड वाहून आणतात.येथील पावणाई च्या देवळात,आदल्या वर्षीच्या होळीचा तोडलेला खुंट तसाच पुरलेला असतो,तो खणून बाहेर काढला जातो. होळदेव म्हणून एक पाषाण असते ते नीट स्वच्छ साफ करून धुवून घेतले जाते, आधीचा खुंट काढून त्या जागेवर ही नवीन होळी म्हणजेच झाड उभे केले जाते. त्यापूर्वी त्याला "आंबेली" म्हणजे आंब्याच्या फांद्यानी सजवले जाते, वर टोकाला भगवा झेंडा काठीला बांधून फडकवला जातो. विधीपूर्वक होळदेव होळीच्या झाडाच्या पायथ्याशी बसवला जातो.या वर्षीच्या पुजेचा मान असलेला यजमान होळीची पूजा करून नैवेद्य दाखवतो.त्यांनंतर पालापाचोळा, गवत एकत्र करून होळीच्या बुंध्याशी पेटवला जातो. त्यानंतर येथील मांडावर सुरू होतो शिमग्याचं खास पारंपारिक फागावर चालणारं कोळीण नृत्य,  पहिल्या रात्रीची सुरुवात कोळीण झालेला, सजलेला स्त्रिवेशातला मुलगा, होळीच्या माडांवर उभा राहतो.. परंपरे प्रमाणे होळदेवाला गाऱ्हाणे घातले जाते. घुमटावर कडकडून थाप पडते आणि सुरू होतो.

गाबीत समाजाच्या उराशी जपलेला पारंपारिक शिमगोत्सव.  कोळीण झालेला कुमार पुढे धुळवड होईपर्यंत रोज मांडावर घुमटाच्या थापेवर म्हटलेल्या फागांच्या तालावर नाचत रहातो पहाटेपर्यंत...दशावताराप्रामाणे रोज नमन होते. गणपतीची पूजा,आरती  होते, त्यानंतर फागांना सुरुवात होते. 

एक फाग झाला की त्या नाच्या मुलाला विश्रांती मिळावी म्हणून मध्ये एक "सोंग" आणतात.  गावच्या आणि एकूणच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर विनोदी पद्धतीने रंगवलेलं वाहन नाटुकलं (आजच्या भाषेत स्किट) म्हणजे सोंग. हे फाग आणि सोंगे रात्रभर चालू असतात. या चार पाच दिवसात सगळ्या पुरुष माणसांनी रात्रीचे घरी न थांबता मांडावर हजर राहायला हवे असा दंडक असतो. कोण कल्टी मारतय  काय यावर  मुलं लक्ष ठेवून असतात.  मुंबईसारखी होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी गावाकडे होत नाही.  धूळ, धूळवड म्हणजे रंगपंचमीचा दिवस. बहुतेक पाचवा  दिवस असतो. होळी तोडल्यानंतरचा ह्या दिवशी रात्रभर फाग, नाच्या किंवा कोळीण नाच, घुमाट आणि सोंगा यांचं रोम्बाट चालू असते.. पहाटे वाडेचार काढण्यासाठी धूप घातला जातो आणि घराण्याचा  देव ठराविक कुडी(माणूस)च्या अंगात येतो,  त्याला "देवानं आंग धरल्यान "असही  म्हणतात.. "वाडेचार इलो"  असं  पण म्हटले जाते.. गुलालाची उधळण सुरू होते.. हीच ती रंगपंचमी.. अंगात देव आलेली कुड वेगात येऊन मांडार घुमू लागते, मग मेळेकरी लोकांचे, पाहुण्यांचे, भावकीचे प्रश्न देवापुढे मांडले जातात. कौल, नवस होतात, जुने फेडले जातात, देवाने अंग सोडल्यानंतर  हा  कार्यक्रम संपतो.आलेले नवसाचे पेढे आणि तोरणांचे नारळ फोडून सगळ्यांना पेडे खोबऱ्याचा  प्रसाद दिलो जातो, अशा रितीने हे वार्षिक . शिमगोत्सवाची साजरा होतो. 

येथील मांडावर हे पारंपरिक प्रतिवर्षी असेच चालू असते, त्यात भावकीतल्या तरुण आणि वयस्कर मंडळी मनापासून समरस होतात तुमच्या माहितीसाठी रामायणामधील एक सुंदर पारंपारिक फाग खाली देत आहे...

पहिले नमन माझे, विघ्नेश्वरा नमीन मी संत गुरुच्या चरणा हो.... संत गुरुंच्या चरणा नमन मी संत गुरुच्या चरणा..... पहिले नमन माझे पावणाईला, पहिले नमन माझे  पावणाईला,.... दुसरे नमन माझे भावईला दुसरे नमन माझे भावईला..... तिसरे नमन माझे अनुभवाला, तिसरे नमन माझे अनुभवआला.... नमन माझे गांगोला, चवते नमन माझे गांगोला..... नमन माझे आकाराला, पाचवे नमन माझे आकाराला..... नमन माझे राखणेश्वराला.... सहावे नमन माझे राखणेश्वराला..... नमन माझे लक्ष्मीला, सातवे नमन माझे लक्ष्मीला..... नमन माझे लिंगाला.... आठवे नमन माझे लिंगाला..... नमन माझे हरेश्वराला..... नववे नमन माझे हरेश्वराला.... दहावे नमन माझे भवानी हो...... दहावे नमन माझे  भवानीला.... नमन माझे इसवटयालाहो..... अकरावे नमन  माझे इसवटयाला.....   नमन माझे मांडकाऱ्याला हो..... बारावे नमन माझे  मांडकाऱ्याला...... नमन माझे सभेला हो..... तेरावे नमन माझे सभेला..... हर हर नमन गाईन, गाईन सर्व देवा....‌ हर हर नमन गाईन गाईन काय सर्व देवा....‌‌

शिग्मा खेळाची निर्मिती इतिहास काळात सरखेल कान्होजी आंग्रे यानी विजयदुर्ग आरमाराचे प्रमुख म्हणून संपूर्ण देवगड विजयदुर्ग येथील किनारपट्टीवर आपला फार मोठा दरारा निर्माण केला होता. संभाजी आंग्रे यांनी इंग्रजाचा विजयदुर्ग बंदरात इ.स.१७३८ साली दारूण पराभव केला संभाजी आग्रे याचे विजयदुर्ग येथे इ.स. १७४२ साली निधन झाले. याची समाधी रामेश्वर मंदिराच्या आवारात बांधण्यात आली. त्याची स्मृती जागविण्याचे काम गाबित समाज मंडळी करू लागली गाबित मंडळींनी शिमगोत्सव सुरू करून शिमगा  खेळ खेळायला सुरूवात केली. त्यात संभाजीराव आंग्रे यांनी मनोरंजन करीता प्रोत्साहन दिले म्हणून आग्रेयाच्या धर्मपत्नीच्या सती याच्या स्मारकासमोर कोळीण नाचवून आपली स्वामीनिष्ठा प्रगट केली जाते. हळू हळू देवगड मधील प्रत्येक गाबित वस्तीवर शिमगोत्सव सुरू केला गेला. आज अडीचशे वर्षे त्याची परंपरा बनून गेली आहे.