
देवगड : देवगड तालुका शरद पवार गट राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देवून रस्त्यांचा दुरावस्थेबाबत कनिष्ठ अभियंता श्री.गायकवाड यांना धारेवर धरले. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे.ग्रामीण भागात जाणारे मुख्य रस्ते पुर्णत: खराब झाले असून रस्त्यांची ठिकठिकाणी चाळण झाली आहे.ग्रामीण भागातील रस्ते अतिवृष्टीने खड्डेमय बनल्याने वाहन चालविणेही कठिण झाले आहे.
गणेशोत्सव जवळ येत असल्याने खड्डे बुजवून रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.रस्त्याचा दुतर्फा वाढलेली झाडीझुडपेही तोडण्यात यावी.मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने समोरून येणारे वाहनही दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे रस्त्यांची दुरूस्ती तात्काळ करावी अशी मागणी करण्यात आली.
देवगड तालुक्यातील रस्त्यांचा दुरावस्थेबाबत राष्ट्रवादीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.गणेशोत्सवापुर्वी रस्ते दुरूस्त करा व झाडीझुडपे तोडून रस्ते वाहतुकीस सुयोग्य करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, वैभव बिडये, मोंड उपसरपंच अभय बापट, शरद शिंदे, नागेश आचरेकर, निलेश पेडणेकर, सौ.पुनम कुबल, ज्ञानदेव भडसाळे,बाबू वाळके, उदय रूमडे, चंद्रकांत पाळेकर, शिवराम निकम, सुधीर देवगडकर आदी उपस्थित होते.