तिलारी कालव्याची पाईपलाईनच कोसळली

या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद
Edited by: लवू परब
Published on: January 22, 2025 15:15 PM
views 337  views

दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची घोटगेवाडी येथील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मंगळवारी मध्यरात्री कोसळली. यामुळे घोटगेवाडी, घोटगे, परमे या गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. गतवर्षीच या पाईपलाईनची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र ती डागडुजी केलेली पाईपलाईन अखेर कोसळली आहे.

तिलारी धरणाच्या डावा आणि उजवा अशा कालव्यातून पाणीपुरवठा होतो. यातील घोटगे, परमे गावांना या कालव्यातून शेती बागायतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. गतवर्षी या उजव्या कालव्याच्या घोटगेवाडी येथील पाईपलाईनला गळती सुरु झाली होती. यावेळी येथील शेतकऱ्यांनी वारंवार सांगून त्या पाईपलाईनची तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र तात्पुरती केलेली डागडुजी आता शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आली आहे. ऐन उन्हाळ्यात ही घटना घडल्याने घोटगे, परमे येथील शेतकऱ्यांच्या बागायती सुपारी, नारळ बागायतींना पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होणार आहे.