
दोडामार्ग : तिलारीच्या कालव्यात सापडलेल्या परप्रांतीय कामगाराच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तर बेपत्ता असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध लागलेला नाही. साटेली भेडशी येथे जेवणासाठी दोघे नाही तर चौघेजण आल्याची कुजबुज सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणी वेगळाच संशय व्यक्त केला जात असून मृतदेहाचा विसेरा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तसेच बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
खानयाळे येथील एका फार्म हाऊसवर गवंडी काम करण्यासाठी कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील संजू मुकुलकट्टी व मंजुनाथ होडागी हे दोघे परप्रांतीय कामगार होते. ते त्यांच्या अन्य साथीदारांसोबत राहत होते. सोमवारी सायंकाळी चारजण साटेली भेडशी येथे जेवणाच्या निमित्ताने आले होते. दोघेजण अगोदर निघून गेले. तर संजू व मंजुनाथ हे पाठीमागे राहिले होते. मात्र उशिरापर्यंत रूमवर दोघेजण न परतल्याने अन्य साथीदारांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मंगळवारी दुपारी एक मृतदेह तिलारी प्रकल्पाच्या कालव्याच्या गेटला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. तो मृतदेह संजूचा असल्याची खात्री पटली. तर त्याचा साथीदार मंजुनाथ हा न मिळाल्याने त्याचाही शोध सुरू होता. मात्र तो अद्याप मिळून आलेला नाही.
संजूचा मृतदेह साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्याच्या डोक्यावर काही जखमा असल्याने हा अपघात की घातपात? अशा चर्चा सुरू झाल्या. शिवाय संजूचा साथीदार गायब असल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. त्यामुळे मंजूनाथचा शोध घेणे पोलिसांसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.
संजूच्या मृतदेहाचा व्हिसेरा पुणे येथे पाठवला आहे. आठ दिवसांत त्याचा अहवाल मिळेल. त्यानंतरच संजूच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल. मात्र तुर्तास काहीही सांगणे कठीण आहे. शिवाय मृतदेहाच्या माथ्यावर वगैरे काही जखमा असल्याचे साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.