गेळे प्रश्न आमदार दीपक केसरकरांमुळेच सुटला !

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा दावा
Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2025 18:10 PM
views 40  views

सावंतवाडी : गेळे कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे सुटला आहे. गतवर्षीच तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत सात-बाराचे वाटप झाले होते. असे असताना भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे हे गेळे गाव महाराष्ट्र शासनाच्या सातबारा नोंदीतून स्वातंत्र्य झाला असे सांगून केवळ दिखाऊपणा करत आहेत अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केली. 

श्री परब यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख नारायण राणे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे , झेवियर फर्नांडिस, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते. श्री परब पुढे म्हणाले, आंबोली गेळे व चौकुळ या तिन्ही गावातील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी वेळोवेळी प्रयत्न केले.प्रसंगी वनमंत्री महसूल मंत्री यांच्याशी बैठकाही घेतल्या, याचे फलित म्हणून वर्षभरापूर्वी आंबोली आणि गेळे या दोन्ही गावातील कबुलायतदार गावकर प्रश्नातील खाजगी जमिनीचे वाटप करण्याचा शासन निर्णय झाला होता. त्यानंतर चौकुळ गावचाही असाच विषय मार्गी लागला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी पेढे वाटप करून आनंदही व्यक्त केला होता. असे असताना संदीप गावडे हे हा जमीन प्रश्न आता सुटला असे भासवून जनतेची दिशाभूल करत आहे. मुळातच आंबोली आणि चौकुळ या दोन्ही गावाने वन जमीन आणि खाजगी जमीन या दोन्ही जमिनीचे वाटप एकत्र व्हावे अशी मागणी आमदार केसरकर यांच्याकडे केली. त्यामुळे तेथील खाजगी जमिनीचे वाटप अद्याप झालेले नाही. त्यामुळे दोन-तीन वर्षात या ठिकाणी येऊन मी केले असे कोण  म्हणत असेल तर चुकीचे आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटा प्रयत्न करत असेल तर अशा खोट्या प्रयत्नातून निवडणुका जिंकता येत नाही. गेळे गाव स्वतंत्र झाले असे म्हणत आहे. त्या तुमच्या नेत्यांना चौकुळ आंबोलीचा जमीन प्रश्न दिसला नाही का, उगाच गेल्या वर्षीचे फटाके यावर्षीतून फोडण्याचा प्रयत्न करू नका असंही ते म्हणाले. 

श्री परब पुढे म्हणाले, कबुलायदार गावकर जमीन प्रश्न समितीचे अध्यक्ष हे आमदार दीपक केसरकर आहेत. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री यांना या समितीचे अध्यक्षपद करण्यात आले आहे. ज्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के काम केले त्या आमदार केसरकर यांचे नाव संदीप गावडे यांनी घेणे क्रमप्राप्त होते परंतु त्यांनी नाव न घेतले हे चुकीचे आहे. ज्याप्रमाणे आज पत्रकार परिषद घेऊन संदीप गावडे यांनी गेळे गावातील जमीन वाटप संदर्भात भाष्य केले तसे उद्या आम्हीही चौकुळ आणि आंबोली गावाचा जमीन वाटप करू शकतो परंतु ग्रामस्थांनाच वन आणि खाजगी दोन्ही जमिनीचे वाटप एकत्र हवे आहे. त्यामुळे उगाच आपल्या नेत्यांचे नाव पुढे करून कोणी दिखाऊपणा करण्याचा प्रयत्न करू नये असाही इशारा दिला.