केर प्राथमिक शाळा, अंगणवाडीचा नवा लूक वेधतोय लक्ष !

सामाजिक उठावातून काम पूर्ण
Edited by: संदीप देसाई
Published on: March 11, 2024 15:00 PM
views 155  views

दोडामार्ग :  आपण जर चांगल काम करत असू तर शासन प्रशासन यांच्या जोडीला स्वयंसेवी संस्थाही पुढे येऊ शकतात आणि यातून गावचा विकास होऊ शकतो याचे उदाहरण दोडामार्ग तालुक्यातील केर गावात पहायला मिळाले येथील ग्रामपंचायतला सहकार्य करत निसर्गमित्र आणि वन्यजीव अभ्यासक गिरीश पंजाबी यांनी केर गावाला विविध संस्थाची मदत मिळवून देत शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे मजबुतीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

    याबाबतची अधिक माहिती अशी की, केर हा गाव ग्रुप ग्रामपंचायत केर -भेकुर्ली कार्यक्षेत्रात येत असून डोंगराळ भाग आहे. येथील ग्रामस्थांची एकी ही आदर्शवत असून हा गाव आदर्शगाव म्हणून ओळखला जातो. डोंगराळ भाग असल्याने येथे वन्यहत्तीसह सर्वस्तरीय वन्य प्राणी आढळून येतात साहजिकच शेती बागायतीचे वन्यप्राण्याकडून नुकसान सातत्याने सुरु असते. या भाग वन्य पशु पक्षी, वनसंपदा याने समृद्ध असल्याने वन्यजीव अभ्यासक गिरीश पंजाबी यांचे येणे जाणे या भागात असते. ग्रामीण भागातील सार्वजनिक सोयीसाठी विविध संस्थाच्या सीएसआर फंडातुन निधी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असून यावर्षी त्यांनी शाळा, अंगणवाडी, विहीर यावर लक्ष केंद्रित केले. आज केर जि. प. शाळेचे रंगकाम पूर्ण झाले असून शाळा सुबक, सुंदर दिसत आहे तर अंगणवाडीतील प्रत्येक भिंत बोलकी झाली झाले. या इमारतीचे मजबुतीकरणही करण्यात आले शिवाय विहिरीला संरक्षण जाळी बसाविण्यात आली. केर-भेकुर्ली अंगणवाडी आणि शाळेसाठी पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम सह्याद्री वाइल्डलाइफ फाउंडेशन आणि रोटरी सनराईज सोशल सेंटर, कोल्हापूर यांच्यातील हा सहयोगी प्रकल्प आहे. टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सच्या सीएसआर द्वारे हा निधी प्राप्त झाल्याचे श्री. पंजाबी यांनी सांगितले.

याबरोबरच चित्रकार विनोद देसाई,  तुषार देसाई या गावातील युवकांचे तसेच यामहत्वपूर्ण योगदानासाठी समन्वयक म्हणून वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या संजय सावंत, तुषार देसाई, अमित सुतार, संजय नाटेकर यांचे सहकार्य  मिळाले असून सरपंच रुक्मिणी मुकुंद नाईक, उपसरपंच तेजस तुकाराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य - मेघना महादेव देसाई, गायत्री गणपत देसाई, यशवंत राजाराम देसाई, लक्ष्मण नाऊ घारे, प्रियंका मंगेश देसाई, लक्ष्मी नारायण धुरी, ग्रामसेवक संदीप पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत