आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर !

राजकीय इच्छाशक्ती हवी ; जिल्ह्यात डॉक्टर ओसंडून वाहतील : डॉ. जयेंद्र परुळेकर
Edited by: विनायक गांवस
Published on: September 27, 2025 14:23 PM
views 235  views

सावंतवाडी : उच्च न्यायालय आरोग्य यंत्रणेवर कडक ताशेरे ओढून प्रधान सचिवांना हजर राहण्याची तंबी देते. यावरूनच सुरू असलेला भोंगळ, अनागोंदी कारभार समोर येतो.  'प्रतिज्ञा'पत्रात शासनाकडून ट्रामा केअर युनिट असल्याचे खोट सांगितले गेले. याचवेळी 'आरटीआय'च्या उत्तरात या युनिटमधील ५ ही पद रिक्त असल्याचे समोर आले. त्यामुळे यात संदिग्धता असल्याचे दिसून येते, असं मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले. तर, राजकीय इच्छाशक्ती असल्यास डॉक्टर ओसंडून वाहतील एवढे डॉक्टर जिल्ह्यात येतील असही विधान त्यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी ५ डॉक्टर आहेत. उर्वरित कंत्राटी आहेत. वर्षानुवर्षे रुग्णांची हेळसांड इथे होत आहे‌. १०८ मधून दिवसागणिक गोव्याला जाणारे रुग्ण बघता हॉस्पिटल आहे की दवाखाना ? हे लक्षात येत नाही. दवाखान्यात तरी उपचार होतात. इथे दोन चांगले सर्जन आहेत, भुलतज्ञ देखील येतात. मात्र, गंभीर शस्त्रक्रिया होत नाहीत. सर्जरी केल्यानंतर लागणारा अतिदक्षता विभाग इथे नाही. अतिदक्षता विभागाचा आत्मा हा एमडी फिजीशीयन असतो. मात्र, हेच पद इथे रिक्त आहे. केवळ दिखावा करून उपयोग नाही. डॉक्टर व सुविधा चांगली असल्यास रूग्णांवर चांगले उपचार होतील. त्या तोडीचे डॉक्टर शासकीय रुग्णालयात सेवा देत आहे. मात्र, सध्यस्थिती बघता सामान्य रूग्णांचे हाल कुत्रा खात नाही असं दुर्देवाने म्हणावं लागेल असं मत डॉ. परूळेकर यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, दोन डॉक्टर १० वर्षांपासून गैरहजर आहेत. अनेक शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे. काही ठिकाणी समोर दवाखाने असणारी मंडळी आहे. त्यामुळे सामान्य जनतेत प्रबोधनाची गरज आहे. तरच असले प्रकार होणार नाही. तसेच नव्या मेडिकल ऑफिसरची नेमणूक कोल्हापूरहून होते. मात्र, या नेमणूकीसाठी पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप डॉ. परूळेकर यांनी केला. यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींच लक्ष त्यावर हवं. राजकीय इच्छाशक्ती असल्यास डॉक्टर ओसंडून वाहतील एवढे डॉक्टर जिल्ह्यात येतील, असे विधान त्यांनी केले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उबाठ शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, माजी नगरसेवक विलास जाधव, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, मनसे शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, नंदू पाटील, प्रसाद पावसकर, विजयालक्ष्मी चिंडक, जगदीश मांजरेकर आदी उपस्थित होते.