माणगाव खोऱ्यात महायुतीचा झंझावात

'डोअर टू डोअर' प्रचारातून शक्तीप्रदर्शन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 31, 2026 12:50 PM
views 78  views

कुडाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, माणगाव मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे आणि सिताराम तेली यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, सध्या मतदार संघात 'डोअर टू डोअर' (घरोघरी) प्रचाराचा धडाका सुरू आहे.

विकासाचा 'राणे' पॅटर्न आणि उमेदवारांचा विश्वास

या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप महायुतीने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार राबवला जात आहे. "राणे साहेबांचे नेतृत्व आणि महायुतीची ताकद यामुळे आमचा विजय निश्चित आहे," असा ठाम विश्वास दोन्ही उमेदवारांनी याप्रसंगी व्यक्त केला.

उमेदवारांची जमेची बाजू

रुपेश कानडे (जिल्हा परिषद उमेदवार): 'हाकेला धावून येणारा कार्यकर्ता' अशी ओळख असलेले कानडे जनसंपर्कात आघाडीवर आहेत. त्यांच्या कामाचा आवाका आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ ही महायुतीसाठी मोठी जमेची बाजू ठरत आहे.

सिताराम तेली (पंचायत समिती उमेदवार): कानडे यांच्या सोबतीला सीताराम तेली यांच्यासारखा अनुभवी चेहरा असल्याने महायुतीची पकड अधिक घट्ट झाली आहे.

महायुतीने प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचण्याचे धोरण स्वीकारले आहे. महायुती एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, विजयाची खात्री असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. माणगाव मतदारसंघातील विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुतीलाच कौल मिळेल, असा दावाही यावेळी करण्यात आला.