
लोकप्रतिनिधी नसल्यानं उरले नाही 'वाली' !
सावंतवाडी : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. जीव मुठीत धरून खचलेल्या पुलावरून त्यांना प्रवास करावा लागत आहे. चराठा ग्रामपंचायत, येथील ग्रामस्थांनी लक्ष वेधूनही, एवढंच नव्हे तर जनता दरबारात दाद मागूनही परिस्थिती बदलेली नाही. याउलट पुल अधिक खचून वाहतूकीस बंद झाला आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकप्रतिनिधीच नसल्यानं ग्रामस्थांना कुणी वाली उरलेले नाहीत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र संताप ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्गातून व्यक्त केला जात आहे.
शहरातून गोठणमार्गे भोसले नॉलेज सिटी व कारिवडे गावात हा रस्ता जातो. पत्रकार कॉलनी नजीक, चराठे ग्रामपंचायतीच्या हद्दीत व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो. विद्यार्थी वर्गासह ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी सोयीचा अन् जवळचा हा मार्ग आहे. बेळगाव-सावंतवाडी या वर्दळीच्या मार्गाला हा पर्यायी व सुरक्षित रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावरील पूल खचल आहे. येथील ग्रामस्थांनी वारंवार लक्ष वेधूनही बांधकाम विभाग झोपेचं सोंग घेऊन बसल आहे. काल रात्री खचलेल्या पुलावर गाडी रूतुन अपघात झाला. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र, हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यातच येथून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यी, शिक्षक, पालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने भोसले नॉलेज सिटीकडून हा मार्ग वापरास बंद केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, याकडे ग्रामपंचायतीन लक्ष वेधूनही जिल्हा परिषद बांधकाम विभाग दखल घेत नसल्याने सरपंच प्रचिती कुबल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तातडीने हा रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच रस्त्याची अशी अवस्था होण्यास चुकीचा पद्धतीने बांधलेला नाला व बुजविण्यात आलेली मोरी आहे. यामुळे पावसात पाणी रस्त्यावर येत असून स्थानिक आमदार दीपक केसरकर देखील अडकून पडले होते. याबाबत तहसीलदार, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जनता दरबारात देखील दाद मागितली. मात्र, कोणीही लक्ष दिलं नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी देखील केली नाही. सहा पैकी चार पाईप बुजवले गेल्यानं पुल खचला आहे. त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह येथील ग्रामस्थांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असं मत ग्रामस्थ बाळा कुडतरकर यांनी व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली.