सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सलग चौथ्यांदा विजयश्री खेचून आणला. आतापर्यंतच्या तिन निवडणूकीपेक्षा विक्रमी अशी ८० हजार मत त्यांनी घेतली. सलग चार वेळा मतदारसंघातून निवडणूक येण्याचा विक्रम त्यांनी केला. राजेसाहेब शिवरामराजेंच्या खालोखाल सर्वाधिकवेळा मतदारसंघातून निवडून येण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 1957 साली राणी पार्वतीदेवी भोंसले या आमदार म्हणून निवडून गेल्या. या मतदारसंघातून अन् तळकोकणातून निवडून गेलेल्या त्या एकमेव महीला आमदार ठरल्या. त्यानंतर आजतागायत महिला आमदार होऊ शकल्या नाहीत. 1962 ते 1967 ला राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांनी आमदारकीचा कार्यभार सांभाळला होता. 1972 ला प्रतापराव भोसले या मतदारसंघातून आमदार झाले. पूर्वीच्या वेंगुर्ला मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून येत. सावंतवाडीतून ते यावेळी आमदार म्हणून निवडून आले होते. 1978 मध्ये जयानंद मठकर यांनी सावंतवाडीच नेतृत्व केल. तदनंतर पुन्हा एकदा 1980 ते 1985 या दोन टर्मसाठी राजेसाहेब शिवरामराजे भोसले आमदार म्हणून विधानसभेत भरघोस मतांनी निवडून गेले. 1990 साली प्रवीण भोसले यांना सावंतवाडीकरांनी संधी दिली. 1995 ला पुन्हा एकदा ते विजयी झाले. 1999 ते 2004 पर्यंत शिवराम दळवी यांनी विधानसभेत सावंतवाडीच प्रतिनिधित्व केल. यानंतर 2009 पासून 2019 पर्यंत दीपक केसरकर यांना सावंतवाडीकरांनी पसंती दिली. विजयाची हॅटट्रिक साधत त्यांनी या मतदारसंघात विक्रम केला. 2024 ला सलग चौथ्यांदा विजया चौकार ठोकत आणखीन एक विक्रम त्यांनी आपल्या नावे नोंदविला. इतिहासातील नोंदींप्रमाणे राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी तब्बल पाचवेळा या मतदारसंघाच नेतृत्व विधानसभेत केल. त्यांच्यानंतर दीपक केसरकर यांना सावंतवाडीकरांनी पसंती दर्शविली. मागच्या 75 वर्षांत सावंतवाडी मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून येणारे ते एकमेव आमदार ठरले आहेत.