कोकणी विरुद्ध मराठी वादाला फुटले तोंड

मावजोंच्या वक्तव्यानंतर मराठीप्रेमींत संतापाची लाट
Edited by: विनायक गांवस
Published on: August 30, 2024 11:16 AM
views 362  views

सावंतवाडी : गोव्यात कोकणी विरुद्ध मराठी यांच्यातील शीतयुद्ध नेहमीच पाहायला मिळाले असते. दोन्ही भाषिकांच्या चळवळीचा येथील इतिहास देखील मोठा आहे. साहित्य परंपरा देखील मोठी असून दिग्गज साहित्यिक गोमांतकात होऊन गेलेत. यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी मराठीबाबत नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरुन गोव्यात कोकणी विरुद्ध मराठी वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर गोव्यातील मराठीप्रेमींसह महाराष्ट्रमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

'सरकारी कामकाज केवळ कोकणीतूनच व्हावे. यासाठी राजभाषा कायद्यात कोकणीचा समावेश असावा, मराठीचा समावेश असू नये', असे मत मावजो यांनी व्यक्त केले. 'जी भूमीची भाषा तीच राजभाषा हे तत्व राजभाषा ठरविताना वापरले जाते. संपूर्ण देशात राजभाषा ठरविताना हेच तत्व आतापर्यंत अमलात आणले गेले. कुठल्याही राज्याने दोन भाषांना राजभाषा कायद्यात स्थान दिले नाही. गोवाही त्यास अपवाद होऊ शकत नाही. त्यामुळे मराठी भाषेला गोव्याच्या राजभाषा कायद्यात स्थान असूच शकत नाही', अशी भूमिका साहित्यिक दामोदर मावजो यांनी मांडली.


दरम्यान, महाराष्ट्र देखील या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. डॉ. सतीश लळीत यांनी सोशल मीडियावरून व्यक्त होताना ''दामोदर मावजो, तुमची झाकली मूठ झाकलीच राहू द्या. उघडलीत तर पंचाईत होईल'' अशी तीव्र भावना व्यक्त केली. मराठी भाषेचा द्वेष करणारे ज्ञानपीठ विजेते मावजो यांचा जाहीर निषेध करत असल्याचं मत अॅड. नकुल पार्सेकर यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केले. तसेच 

'गोव्यात भाषिक सौदार्हाचे वातावरण असताना मावजो यांनी केलेले वक्तव्य द्वेष पसरविणारे आहे. तसेच, पुन्हा भाषावादाचे भूत जिंवत करणारा प्रकार आहे', असे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत म्हणाले. 'मराठी अस्मिता सत्तरी यांच्याकडून देखील मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. मावजो यांनी मराठी भाषेच्या अस्तित्वाचा अभ्यास करावा. गोव्याचा सांस्कृतिक इतिहास, शिलालेख मराठीत आहेत हे विसरुन चालणार नाही', अशी प्रतिक्रिया मराठी अस्मिता सत्तरी यांनी दिली. मावजो यांचे वक्तव्य मराठीचा अवमान करणारे आहे, असे मत मराठी राजभाषा प्रस्थापन समिती नोंदवले. तसेच, मराठी आणि रोमी कोकणी यांनाच राजभाषेचे स्थान देणारे विधेयक संमत करावे, असे गो. रा. ढवळीकर म्हणाले आहेत.