
सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव हे वैशिष्ट्यपूर्ण परंपरांमुळे ओळखले जाते. सुवार्डा डोंगरावरील होळीप्रमाणेच येथे शिमगोत्सवात जपली जाणारी ‘कळसवणी’ ही परंपरा गावाच्या सांस्कृतिक वारशाचे अनमोल प्रतीक मानली जाते. शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी मळगावात कळसवणीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडतो.
या दिवशी मळगाव पंचायतन देवस्थानचा कुळ म्हणजे राऊळ मानकरी आणि थळ म्हणजे गावकर मानकरी यांचा कळस गावातील प्रत्येक घरात फिरवण्याची प्रथा आहे. अनेक पिढ्यांपासून जपली गेलेली ही कळसवणीची परंपरा मळगावच्या धार्मिकतेचा अविभाज्य भाग बनली असून आजही गावातील राऊळ व गावकर मानकरी अत्यंत एकोप्याने आणि श्रद्धेने जतन करत आहेत.
गावाची लोकसंख्या मोठी असल्याने आणि वर्षागणिक नवीन घरे वाढत असल्याने कळस फिरविण्याचा हा सोहळा पहाटेच सुरू होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास राऊळ व गावकर यांच्या उपस्थितीत कळस फिरवण्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कुळ घराकडून आणि थळ घराकडून कळस सवाद्य वाजतगाजत गावातील श्री देव रवळनाथ मंदिरासमोरील चव्हाट्याच्या होळीजवळ आणण्यात आले. तेथे दोन्ही कळसांचे विधिवत पूजन करून रवळनाथ देवाला धुपारती अर्पण करण्यात आली. देवाला नैवेद्य दाखवून सामूहिक गाऱ्हाणे झाल्यावर मायापूर्वचारी व तेथून भूतनाथ मंदिरात तीर्थ घालून महापुरुष मंदिरात पूजा करून कळस गावभर फिरविण्याच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. कळस गावातील प्रत्येक घरात पोहोचताच घरी आलेल्या कळसाचे ग्रामस्थांनी पारंपरिक रिवाजाप्रमाणे दीप, अगरबत्ती, फुले आणि नारळ अर्पण करत भक्तीभावाने पूजन केले. या सोहळ्याची विशेष बाब म्हणजे गावातील राऊळ व गावकर मानकरी अनवाणी पायांनी संपूर्ण गावभर अक्षरशः धावत हा कळस फिरवतात. सकाळपासून सुरू झालेला हा प्रवास सायंकाळी पाच वाजेपर्यंत अखंड सुरू राहतो. एका दिवसात पूर्ण गाव फिरवणे कठीण असले तरी ठरलेल्या वेळेत कळस गावभर फिरवण्याची परंपरा आजही तेवढ्याच जिद्दीने आणि निष्ठेने पाळली जाते. या धार्मिक कार्यात राऊळ व गावकर घराण्यातील ज्येष्ठ मंडळीसह प्रामुख्याने तरुण आणि लहान मुलेही उत्साहाने सहभागी होताना दिसतात.
सायंकाळी गावातील सर्व वाडी-वाडीतील ग्रामस्थ एकत्र येऊन पारंपरिक गाव रोंबाट काढतात. हे रोंबाट श्री देव रवळनाथ मंदिरासमोरील चव्हाट्याच्या होळीजवळ येऊन समाप्त होतो. याच ठिकाणी शिमगोत्सवाची सांगता करण्यात येते. सायंकाळी वाडीवाडीतील गाव रोंबाटाने मळगावच्या शिमगोत्सवाची सांगता झाली.










