
सावंतवाडी : येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम मार्गी लागेपर्यंत मासिक सभा घेण्याचा प्रश्न अडचणीचा बनला आहे. सध्याच्या जागेची कमतरता आणि नियोजित स्थलांतरामुळे उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेता पंचायत समितीच्या मासिक सभांसाठी नगरपरिषदेचे सभागृह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी उपसभापती गौरव मुळीक यांनी प्रभारी नगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंचायत समितीची जुनी हक्काची इमारत २०१९ मध्येच निर्लेखित करण्यात आली असून तेव्हापासून समितीचे कामकाज शिरोडा नाका येथील कृषी गोदामात तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. मात्र, आता शासनाने नवीन भव्य इमारतीच्या बांधकामाला मंजुरी दिली असून ज्या ठिकाणी सध्या कामकाज चालते, त्याच गोदामाच्या जागी ही नवीन इमारत उभी राहणार आहे. या नवीन बांधकामाच्या प्रक्रियेमुळे पंचायत समितीचे कार्यालय आता 'तालुका स्कूल नं. १' येथे हलवण्यात येणार आहे. या स्थलांतरामुळे कार्यालयीन कामकाजासाठी जागा उपलब्ध होणार असली तरी दरमहा होणाऱ्या मासिक सभेसाठी ही जागा अत्यंत अपुरी पडणार असल्याचे उपसभापतींनी पत्रात नमूद केले आहे. नियमानुसार होणाऱ्या या सभेला साधारणपणे ४० ते ५० सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असतात. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती असलेल्या सभेसाठी सध्या पंचायत समितीकडे स्वतःची पुरेशी जागा शिल्लक नाही. या तांत्रिक अडचणीवर तोडगा म्हणून, जोपर्यंत नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नगरपरिषदेच्या अखत्यारीतील ४० ते ५० आसनक्षमता असलेले सभागृह मासिक सभांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती गौरव मुळीक यांनी प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना केली आहे.
पंचायत समितीच्या मासिक सभा वेळेवर आणि योग्य वातावरणात पार पडणे प्रशासकीय दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्याने, नगरपरिषदेने या विनंतीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर आदी उपस्थित होते.










