
कुडाळ : सप्तरंगाची उधळण करत आज कुडाळ शहरात दीड दिवसाचा होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. बुरा ना मानो होली है म्हणत यामध्ये युवाईसह मुले, वृद्ध सहभागी झाले होते. सप्तरंगात सर्व न्हाऊन निघाले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक होळी सण हा त्या त्या गावांत प्रथेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस ते पंधरा दिवसाचा असतो. कुडाळ शहराचा हा सण दीड दिवसाचा असतो. आज सकाळपासून पाण्याचा वर्षाव करत डीजेच्या तालावर बेधुंद होत हा सण आनंदात साजरा करण्यात आला. शहरात जिजामाता चौक, गांधी चौक, बाजारपेठ, भैरव मंदिर, गवळदेव परिसर, उदयमनगर आदी ठिकाणी सप्तरंगाची उधळण करत अतिशय शांततेत हा सण साजरा करण्यात आला. होळी सणाच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाक्यांनाक्यावर पोलिस यंत्रणा तैनात होती.