कळसुली धरणात मिळणार आता जलपर्यटनाचा आनंद !

बोटींग बरोबरच फिशींगचीही सुविधा प्रेमदया प्रतिष्ठानचा उपक्रम
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 07, 2023 17:50 PM
views 525  views

कणकवली : पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गात आता खर्‍या अर्थाने पर्यटन विकासाला गती मिळू लागली आहे. सागरी पर्यटनाबरोबरच सह्याद्री पर्यटनालाही देशी विदेशी पर्यटक पसंती देवू लागले आहेत. पर्यटन विकासातून गावात रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ विविध सामाजिक उपक्रम राबवणारे कळसुली गावचे सुपूत्र आणि प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी कळसुलीच्या धरणामध्ये पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद देण्यासाठी बोटींग आणि फिशींगची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचा शुभारंभ अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर 22 एप्रिलला होणार आहे. या उपक्रमामुळे कळसुली गाव सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर झळकणार आहे.

सिंधुदुर्गात आर्थिक समृद्धी आणायची असेल तर पर्यटन हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. निसर्गानेही सिंधुदुर्गला भरभरून दिले आहे. त्यामुळे देशी, विदेशी पर्यटक सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने येवू लागले आहेत. सह्याद्रीच्या पायथ्याशी असणार्‍या कणकवली तालुक्यातील कळसुली गावामध्ये आता खर्‍या अर्थाने पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावात कृषी पर्यटन सुरू करत स्थानिक युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. आता त्यापुढे जावून कळसुलीच्या धरणामध्ये पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बोटींग सफारीचा उपक्रम राबवला जाणार आहे. येत्या काळात फिशींग, स्कुबा डायव्हींग हे उपक्रम देखील राबवले जाणार आहेत. बोटींगसाठी पर्यटकांच्या सुरक्षेकरता लाईफ जॅकेटसह आवश्यक सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली आहे.