
सिंधुदुर्गनगरी : स्वच्छतेच्या बाबतीत देशात वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या व्यापक स्वच्छता अभियानास जिल्हावासियांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून २० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाभर आयोजित या अभियानात जिल्ह्यातील १,४३६ शासकीय संस्था सहभागी झाल्या होत्या. यात ३२,११८ नागरिकांनी श्रमदान करून तब्बल ३,६२० किलो कचरा संकलित केला असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
या स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील ७९५ शाळा, २४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे तसेच ३९६ ग्रामपंचायत कार्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शाळा स्तरावर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी वर्गखोल्या, शाळा परिसर, शौचालये तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. प्लास्टिक व सुका कचरा वेगळा करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली
ग्रामपंचायत स्तरावर कार्यालय व परिसर स्वच्छता, अभिलेखांचे वर्गीकरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबल-कपाटांची स्वच्छता, कार्यालय निटनेटके करणे, दिशादर्शक फलक उभारणे तसेच रंगरंगोटीची कामे श्रमदानातून पार पडली. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये कार्यालयीन व परिसर स्वच्छतेसह रंगरंगोटीचे काम करण्यात आले.
जिल्हाभर एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ‘स्वच्छ सिंधुदुर्ग’ ही ओळख अधिक दृढ झाली असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक मानसिकता निर्माण झाल्याचे चित्र आहे. या अभियानास लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविले जातील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली.










