वेंगुर्ला - कुडाळ तिठ्यावर झालेल्या अपघातात जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

Edited by: दिपेश परब
Published on: December 23, 2025 17:31 PM
views 931  views

वेंगुर्ले : तालुक्यातील मठ कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकीत झालेल्या भीषण अपघात गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्य झाला आहे. कुडाळ तालुक्यातील तेंडोली हुडकुंबावाडी येथील मूळ रहिवासी व सध्या कामानिमित्त वेंगुर्ले रामघाट येथे भाड्याने राहणारे मदन अच्युत मेस्त्री ( वय- ४५) असे मयताचे नाव आहे. दरम्यान अपघातात मोटारसायकलचे डबल स्टँड पाठीत घुसून अतिरक्तस्रावाने मेस्त्री यांचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. याबाबत मयत मदन यांचे भाऊ गुरुनाथ मेस्त्री यांनी वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चारचाकी चालका विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

]दरम्यान अपघातानंतर बराच वेळ दुचाकीस्वार मेस्त्री हे घटनास्थळीच राहिले. त्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला. दुचाकीचे स्टँड पाठीत घुसल्याने ते कापल्याशिवाय मेस्त्री यांना रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाला. ते स्टँड कापल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर घटनास्थळी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक राठोड यांच्यासहित पोलीस टीम दाखल होत वाहतूक सुरळीत करून पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी तसेच रुग्णालयात तेंडोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.