माजगाव-चिपटेवाडीतील धरण प्रकल्पाचा प्रश्न मार्गी

१० जानेवारी पासून शेतकऱ्यांना मिळणार मोबदला : अर्चना सावंत
Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2024 11:51 AM
views 131  views

सावंतवाडी : शहराच्या लगत असलेल्या माजगाव येथे लघु पाटबंधारे प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. जमिनीच्या नुकसान भरपाई रक्कमेमुळे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले नव्हते. मात्र, आता येत्या १० जानेवारी पासून मोबदला मिळेल असे आश्वासन शेतकऱ्यांना मिळाले आहे अशी माहिती माजगाव  सरपंच डॉ. अर्चना सावंत यांनी दिली आहे.गेल्या काहीवर्षांपासून माजगाव-चिपटेवाडी येथे होणाऱ्या धरण प्रकल्पाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली भु-संपादन प्रक्रिया पुर्ण झाली असून येत्या १० तारखेपासून शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळणार आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांनी तसे आश्वासन दिले आहे असे त्यांनी सांगितले.

याबाबत संबंधितांना तात्काळ मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी सरंपच डॉ. अर्चना सावंत, माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, अभय सावंत, अजय सावंत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. त्यामुळे यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र तात्काळ जमा करुन मोबदला वेळेत घ्यावा, असे आवाहन सरपंचा डॉ. सावंत यांनी केले आहे.

सावंतवाडी शहराला लागून असलेल्या माजगाव महादेव मंदिर परिसरात दोन डोंगराच्यामध्ये हा प्रकल्प होणार आहे. त्यासाठी ९.२८ हेक्टर इतकी जागा बाधित होणार आहे. त्यात ३५ ते ४० शेतकऱ्यांच्या जमिनी बाधीत होणार आहेत. हा प्रकल्प १५ वर्षापुर्वी मंजूर झाला होता. मात्र, निधी नसल्यामुळे तो रखडला होता. गेल्या अनेक वर्षात हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. त्याला आता गती मिळाली आहे. हा प्रकल्प झाल्यानंतर माजगावसह आजूबाजूच्या परिसराला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. माजगाव येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे निकाली निघेल असा विश्वास सरपंच अर्चना सावंत यांनी व्यक्त केला आहे.