नद्यांतील रासायनिक सांडपाण्याचा मुद्दा विधानसभेत गाजला

आमदार शेखर निकम यांचा प्रखर आवाज
Edited by: मनोज पवार
Published on: July 01, 2025 15:38 PM
views 140  views

चिपळूण : तालुक्यातील नद्यांमध्ये अनधिकृतरीत्या रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या काही खासगी कंपन्या आणि टँकर माफियांविरोधात आमदार शेखर निकम यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ठाम आणि ज्वलंत भूमिका घेतली. विधानसभेत या विषयावर आवाज उठवत, त्यांनी स्थानिक शेतकरी व मच्छीमार बांधवांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अत्यंत स्पष्टपणे मांडला.


आमदार निकम यांनी सांगितले की, केतकी, करबवणे, मालदोली, भिले या भागातील नद्यांमध्ये रात्रीच्या वेळी काही टँकरद्वारे रसायनयुक्त सांडपाणी सोडले जाते. यामुळे स्थानिक जलस्रोत दूषित होत असून, नदीच्या काठावरील शेती व मासेमारी व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत आहे. रापण टाकून मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर यामुळे गदा आली आहे.


“या बेकायदेशीर कृतीमुळे स्थानिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपन्यांकडून नुकसानभरपाईसाठी धोरण आखण्याबाबत शासन बैठक घेण्यास तयार आहे का?” — असा थेट आणि रोखठोक सवाल आमदार निकम यांनी सरकारकडे केला.


या मुद्द्यावर उत्तर देताना राज्याच्या मंत्री महोदया श्रीमती पंकजा मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेत, “या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहून आवश्यक तो निर्णय घेतला जाईल,” असा आश्वासक प्रतिसाद दिला.


आमदार निकम यांच्या या स्पष्ट व जाहीर भूमिकेचे परिसरात सर्व स्तरातून स्वागत होत असून, स्थानिक शेतकरी व मच्छीमार बांधवांच्या न्यायहक्कासाठी उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांचे कौतुक होत आहे. या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जनतेकडून होत आहे.