पारंपारिक मच्छीमारांचं बेमुदत उपोषण सुरूच..!

Edited by:
Published on: November 17, 2023 20:04 PM
views 123  views

मालवण : अनधिकृत पर्ससीन नौकांवर कारवाई सह अन्य मागण्यासंदर्भात पारंपारिक मच्छीमारांनी कालपासून मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी काही मच्छीमारांची प्रकृती खालावली. मात्र त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.  दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने उद्या सकाळपासून सर्वांनी मासेमारी व मासे विक्री बंद ठेवून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्याचे आवाहन उपोषण कर्त्यांनी केले आहे. 

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत पर्ससीन नौकांवर कारवाई करण्यात यावी यासह अन्य मागण्यासंदर्भात अखिल भारतीय मच्छीमार कृती समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक मच्छीमारांनी काल सकाळपासून येथील मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार मच्छीमारांनी केला आहे. उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना सलाईन व गोळ्या देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या. मात्र उपचार घेण्यास मच्छीमारांनी नकार दिला.

उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने उद्या सकाळपासून मच्छीमारांनी मासेमारी व मासे विक्री बंद ठेऊन प्रशासनाचा निषेध करावा असे आवाहन केले आहे.