
वेंगुर्ला : तालुक्यातील होडावडा गावात पंचक्रोशीतील दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ व लकी ड्रॉ च्या माध्यमातून उभ्या केलेल्या निधीतून गावासाठी घेण्यात आलेल्या अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण शनिवारी (१६ नोव्हेंबर) येथील ग्राममदेवता श्री क्षेत्रपालेश्वर व श्री देवी सातेरी ला श्रीफळ ठेऊन तसेच सवांतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते फित कापून व जेष्ठ नागरिक शशिकांत होडावडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
होडावडे गावात गरजू रुग्णासाठी आणि अत्यावश्यक सेवेसाठी बरीच वर्षे रुग्णवाहिका सेवा उपलब्ध नव्हती. बऱ्याचवेळा रुग्णवाहिकेसाठी गावातील ग्रामस्थांना आजूबाजूच्या गावातील रुग्णवाहिकेंवर अवलंबून राहावे लागत असे. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रुग्णाला तात्काळ उपचारासाठी विलंब होऊन अनेकदा रुग्ण दगावले आहेत. अश्या अत्यावश्यक सेवेचे भान राखून गावातील
होतकरू तरुण ग्रामपंचायत सदस्य अरविंद नाईक, सामाजिक कार्यकर्ते रवि केळुसकर, सतीश तांबोसकर यांनी आपल्या गावात सुद्धा आपली हक्काची रुग्णवाहिका हवी म्हणून ती आणण्यासाठी प्रयत्न केले. याचाच एक भाग म्हणून आपल्या गावातील "शेतकरी मंडळ होडावडा" यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी विविध शेतीविषयक वस्तूंचा लकी ड्रॉ ठेवला. तसेच लोक सहभागातून व दानशूर व्यक्ती ग्रामस्थ यांच्या सहकार्याने रुग्णवाहिका गावात आणली. या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी जि प माजी सदस्य नितीन शिरोडकर, बाळा दळवी, संजय परब, अभिषेक झांटये यांच्यासाहित गावातील दानशूर व्यक्ती व ग्रामस्थ उपस्थित होते.