
मंडणगड : विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आंबडवे ता. मंडणगड या महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या मागणीकरिता प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणास बसले आहेत. आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे यावेळी या उपोषणकर्त्यांनी जाहीर केले. सलग तिसऱ्या दिवशीही हे आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, उपोषणकर्ते कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशी (दि. 27 ) प्रकृती ढासळली, त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी प्रशासना द्वारे पाठवण्यात आले.
या विषया संदर्भात शिक्षेकत्तर कर्मचारी, देणगीदार जमीन मालक सुशांत सकपाळ, अमोल सकपाळ, निलेश सकपाळ, उदय जाखल, सुजाता सकपाळ, विनीत सकपाळ, प्रिती तांबे, प्रफ्फुल तांबे, राजेंद्र राऊत, रमेश सकपाळ, सौरव सकपाळ, प्रशांत सकपाळ, अक्षय सकपाळ हे आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्यासमवेत जागृती मंडळाचे सुदर्शन सकपाळ व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, आंबडवे येथे झालेल्या महाविद्यालयास गावातील ग्रामस्थांनी देणगीरुपाने 13.50 एकर मोफत जागा उपलब्ध करुन दिली. असे असताना मुंबई विद्यापिठाने ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केलेली नाही. विद्यापिठाच्या अधिकाऱ्यांनी आम्हांला दिलेला शब्द वेळेवेळी फिरवीला आहे. देणगीदारांपैकी सात कुंटबातील व्यक्तींना कामावर घेण्यात आले. अद्याप सहा कुटुंबातील व्यक्तींना रोजगार देण्यात आलेला नाही. कामावर घेतलेल्या सात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्यशासनाच्या कर्मचारी भरतीच्या अटी व शर्थीचे नियमांच्या अधीन राहून भरती कऱण्यात आलेली नाही. सर्व कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने कामावर घेण्यात आलेले आहे व दरवर्षी त्यांची मान्यता घेतली जाते त्यांना कामावर कायम करण्यात आलेले नाही. विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात नाही तर ठोक पध्दतीने वेतन दिले जाते. विद्यापीठाने दिलेल्या या वागणूकीच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवूनही सेवेत कायम करणे, नियामाप्रमाणे वेतन देणे, व मागील फरकाची वजावट देणे या तीन मागण्यासाठी विद्यापिठाचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी गतवर्षीच्या जानेवारी महिन्यापासून चर्चा सुरु आहे. मात्र त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. या संदर्भात लिखीत आश्वासन मिळत नाही व योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे उपोषण कर्त्यांकडून सांगण्यात आले.
उपोषण करणाऱ्या निलेश सकपाळ व प्रिती तांबे या दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना प्राथमिक तपासणी करून मंडणगड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान ता. २७ जानेवारी रोजी प्रशासनाच्या वतीने समन्वयक दीपक रावेरकर व मंडळ अधिकारी प्रकाश साळवी यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठाकडून आलेले पत्र त्यांना वाचून दाखवले. पत्रात नमूद केल्याप्रमाणे ता. २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कुलगुरू यांनी यासंदर्भात मुंबई येथे बैठक आयोजित केली असून उपोषणकर्त्याना बोलवण्यात आले आहे. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.