
सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानद्वारे ९ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात 'धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज....' या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी "धर्मरक्षक" म्हणून केलेल्या महानकार्यातील अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेक पैलू आहेत. यात शौर्य आहे, आदर्श आहे, धैर्य आहे, तेज आणि बरेच काही.. एका जन्मात इतके मोठे कर्तृत्व जगभराच्या इतिहासात फार कमी राजांना निर्माण करता आले. महाराजांच्या कर्तृत्वाच्या या सगळ्या पैलूंमध्ये "धर्मरक्षक" म्हणून त्यांनी केलेले कार्य अगदी उजळून दिसते. शिवशाहीच्या अगोदर आपल्या प्रांतावर मुघल आणि आदिलशाहीचा प्रभाव वाढला होता. मराठी जनमाणसाला जगणे मुश्किल झाले होते. माणसं सोडा मंदिरातील देवही सुरक्षित नव्हते. दुसऱ्या बाजूने पोर्तुगीज डोके वर काढू लागले होते. या सगळ्यातून केवळ धर्मच नाही तर इथली संस्कृती अडचणीत आली होती. अत्याचाराने परिसिमा गाठली होती. याचवेळी सह्याद्रीच्या रांगामधून सुरू झालेल्या भगव्या झंजावाताने संस्कृतीवर घाला घालणाऱ्या या प्रवृत्तींना सळो की पळो करून सोडले. अत्याचाराचा अस्त झाला. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. महाराजांनी केवळ हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले नाही तर इतर धर्माचा आदर कसा करावा ? याचा आदर्श पूर्ण जगाला घालून दिला. यातूनच त्यांच्या कर्तृत्वाची उंची मोजायला आकाश ठेंगणे पडू लागते.
त्यांची ही शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराजांनी धर्मरक्षक म्हणून बजावलेल्या शौर्याच्या पराक्रमाचा इतिहास सखोल समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने डॉ प्रविणकुमार ठाकरे व गोविंद उर्फ केदार बांदेकर यांनी केले आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी शिवजागराचे.. रयतेचे राजे शिवराय आमुचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, महाराजांची आग्र्याहून सुटका, नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगडाचा रणसंग्राम, छत्रपतींचा दक्षिण दिग्विजय, रणझुंजार ताराराणी साहेब असे ८ पुष्प सादर करण्यात आले. याला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे हे ९ वे पुष्पदेखील ऐतिहासिक राजवाड्याच्या
सिंधुदुर्गवासीयांच्या गर्दीने बहरणार आहे. डॉ शिवरत्न शेटे हिंदवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून महाविद्यालयीन जीवनापासून शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून व्याख्याने देत आहेत. आपल्या ओघवत्या वाणीच्या शिव व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्याचे कसब त्यांच्यात आहे. समकालीन बखरीसह इतिहासाचार्यांच्या भेटी व त्यांच्या लेखनाचा अभ्यासही त्यांनी केला आहे. तसेच राजे प्रत्यक्ष ज्या ज्या भागात व ज्या ज्या मार्गाने गेले त्याचाही त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी जुलै महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड तर हिवाळ्यात विविध गडकिल्ल्यांवर अशा दोन मोहिमा आयोजित केल्या जातात. यात हजारो शिवभक्त सहभागी होतात. तसेच शेतकरी आत्महत्या प्रबळ भागात शिवचरित्राच्या माध्यमातून संकटांचा सामना कसा करावा याबाबत व्याख्याने देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद जागवतात.










