
वैभववाडी : करुळ ग्रामपंचायतीच्यावतीने गावात १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली असून, त्यामुळे गावातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या सर्व बंधाऱ्यांची वैभववाडी पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ यांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले.
गावात मे महिन्यात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन करुळ गावात १०वनराई व कच्चे बंधारे बांधण्यात आले.नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जामदारवाडी येथे उभारण्यात आलेल्या कच्च्या बंधाऱ्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन वर्षाचे स्वागत गावकऱ्यांनी जलसंवर्धनाच्या उपक्रमातून केल्याबद्दल मान्यवरांनी या कार्याचे विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत करुळ गावात जलसंधारणाची कामे सुरू असून, हे दहा बंधारे ग्रामपंचायत करुळ, के. सी. महाविद्यालय मुंबई, माध्यमिक विद्यालय करुळ तसेच ग्रामसेवक संघटना वैभववाडी यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे गावातील विहिरी तसेच बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारली आहे. तसेच पाळीव जनावरांनाही या बंधाऱ्यांचा मोठा फायदा होत आहे.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सरपंच नरेंद्र कोलते, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, श्री. जाधव, मुख्याध्यापक दीपक घाटगे, शिक्षक विलास गुरव, उपसरपंच भास्कर सावंत, संजय कदम, शिवाजी पवार, राजेंद्र पवार, दत्ताराम पाटील, ग्रामसेवक शशिकांत गुरव यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.










