
वैभववाडी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत करुळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात एकूण २४ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. ग्रामपंचायत करुळ, के. सी. महाविद्यालय मुंबई आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच नरेंद्र कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी के. सी. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सतीश कोलते, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पडवळ, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, प्रशांत ढवण, विलास कोलते, सिद्धेश कोलते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वंदे मातरम सामाजिक संस्था संचलित जीवनधारा ब्लड बँक, कोल्हापूर यांनी शिबिरासाठी वैद्यकीय सहकार्य केले. के. सी. महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून उपक्रमाला यश मिळवून दिले. यावेळी सर्व रक्तदात्यांचे सरपंच नरेंद्र कोलते यांनी आभार मानत, अशा सामाजिक उपक्रमांतून तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.










