शिवसेनेच्या नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांनी स्थापन केली 'आघाडी'

पूनम चव्हाण गटनेत्या
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 01, 2026 18:39 PM
views 214  views

मालवण : उप मुख्यमंत्री तथा शिंदे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या थेट नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांनी एकत्र येत श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी या नवीन गटाची स्थापना केली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र आणि ठरावाची प्रत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली असून या नव्या गटाला मान्यता देण्याची मागणी  करण्यात आली आहे.

नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मालवण नगरपरिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी शहराच्या विकासासाठी आणि तांत्रिक कारणास्तव हा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी पूनम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या नवीन आघाडीमुळे नगरपालिकेतील सत्तासमीकरणे अधिक स्पष्ट झाली असून शिवसेनेन आपली पकड घट्ट केल्याचे दिसून येत आहे.

आघाडीत सहभागी असलेले

थेट नगराध्यक्षा ममता वराडकर,  दिपक पाटकर, निना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पूनम चव्हाण, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, श्रीमती मेघा गावकर, श्रीमती शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर यांनी गट स्थापनेच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 

शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी या आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे गटनेत्या पूनम चव्हाण यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. सर्व ११ सदस्यांनी या प्रक्रियेला आपला पाठिंबा दर्शवत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. गट स्थापन केल्याचे पत्र नगरविकास विभाग जिल्हा प्रशासन सहायक विनायक औंधकर यांना सादर करण्यात आले.