तुकारामांच्या विचारांचे वारसदार म्हणजे वामनदादा कर्डक - डॉ. प्रकाश मोगले

सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्गच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक जनशताब्दी वर्षानिमित्त महाचर्चा संपन्न
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 13, 2023 14:42 PM
views 228  views

सावंतवाडी : वामनदादा म्हणजे तमाम शाहिरांची हाक, मात्र वामनदादांपासून शाहिरांची अवहेलना आजही कायमच आहे, आज आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवणारा उपाशी मरतोय, हे तमाम आंबेडकरी बांधवांचे दुर्दैव आहे, जो लढा बाबासाहेब आंबेडकर, वामनदादा यांनी सुरु केला तोच लढा आजही कायम ठेवण्यासाठी आमची धळपळ सुरु आहे, आज सावंतवाडीत येऊन धन्य झालोय, कारण महामानव बाबासाहेब यांचे पावन पदस्पर्श या भूमीला लागलेत.संतसूर्य तुकाराम महाराजांनी साडेचार हजार अभंग लिहिले, त्यात तत्कालीन समाज व्यवस्थेचा विद्रोह आणि मराठी संस्कृतीची बांधणी केली, तेच काम वामन दादांनी केलं.वामनदादांनी कष्टकरी, शेतकरी, सामान्य जनतेचं चित्र आपल्या लेखणीतून मांडले, संतसूर्य तुकारामांच्या विचारांचे वारसदार म्हणजे वामनदादा कर्डक होत, असे वक्तव्य विचारवंत डॉ. प्रकाश मोगले यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.

 सावंतवाडी शहरातील नवसरणी सभागृहात रविवारी सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्गच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक जनशताब्दी वर्षानिमित्त महाचर्चा संपन्न झाली.

या महाचर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मोगले होते.

यावेळी विचारमंचावर महाचर्चाचे उदघाटक ज्येष्ठ साहित्यिक योगीराज बागुल, बीजभाषककार प्रा. आदिनाथ इंगोले, स्वागतध्यक्ष अनिल जाधव, कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर, सुनील हेतकर, विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना डॉ. मोगले म्हणाले, बाबासाहेबांवर १३ हजार कर्ज होतं. जे त्यांनी समाजासाठी घेतलं होतं. एक खासदार, कायदामंत्री यांच्या नावावर मरेपर्यंत कर्ज होतं, हा आजच्या काळातील राजकारणी व्यक्तींना काय शिकवण देतो? याची आज आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

आज बाबासाहेब यांच्या विचारांवर गाणं लिहिणारी किती लोकं प्रामाणिक आहेत?

बाबासाहेबानी जगण्याचा अधिकार दिला म्हणून वामन दादांनी भाकरीवर गाणं कधीच लिहिले नाही त्यांनी लेखणीवर लिहिले.

वामन दादांच्या लेखणीतून जागतिक संघर्ष आहे, तो जगण्याचा आहे.

आज रशिया - युक्रेन संघर्ष यापूर्वी वामन दादांनी आपल्या गीतातून मांडला आहे.

आम्ही बाबासाहेब यांच्या संघर्षामुळे आज उभे आहोत, म्हणून समाजात वावर करा, आम्ही सुशिक्षित झालोय पण बाबासाहेब यांचा संस्कार जपतो काय? हा सर्वांना आत्मपरीक्षण करणारा सवाल आहे. जगा पण बाबासाहेबानी दिलेल्या वाटेवर तरच आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करुन देऊया. हे झाले तरचं बाबासाहेब, वामनदादा कर्डक यांना खरी आदरांजली ठरेल, असेही  डॉ. मोगले म्हणाले.


बीजभाषण करताना प्रा. आदिनाथ इंगोले म्हणाले, वामनदादा म्हणजे आंबेडकरी विचारांचं सांस्कृतिक विद्यापीठ होते. आंबेडकरीवादांच सर्वोत्तम लेखन, गायन करणारे कलावंत, शास्त्रशुद्धपणे आंबेडकरी विचारवंत म्हणजे वामन दादा. असे असताना अनेक लेखक, कवीनी बाबासाहेब यांच्यावर आरत्या लिहिल्या, हे क्लेशदायक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान साध्या, सोप्या भाषेत लिहिणारे वामनदादा अत्यंत प्रतिभावान व प्रबोधनकार व्यक्तिमत्व आहेत. वामन दादांचा एकूण लढा हा भांडवलशाही विरोधात असल्यामुळे आजही तोच लढा आम्हाला लढावा लागतोय.


यावेळी उदघाटक योगीराज बागुल म्हणाले, 'व्हारे तुम्ही नेता नव्या पिढीचा, माझ्या पिढीचा सरताज मीच आहे!' हे वामन दादांचे शब्द म्हणजे एक प्रचंड वादळवारा आहेत. वामन दादा म्हणजे कधीच न संपणारा अखंड प्रवास आहेत. वामन दादा हे कबीरांचे दुसरे रुपचं वाटतात.  वामन दादांचं जीवन अत्यंत कष्ट, अतोनात हाल अपेष्टा व संघर्षमय गेलं. यातूनच पुढे घडलं एक वादळी व्यक्तिमत्व. अनेक ओव्या वामन दादांना तोंडपाठ होत्या. एक अशिक्षित माणूस आपल्या अफाट प्रतिभा शक्तीने काय करु शकतो? याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वामन दादा होत. आयुष्यभर वामन दादांना आर्थिक परिस्थितीने छळलं. ज्यांच्या गीतांवर अनेकांनी हजारो रुपये कमवले ते वामनदादा मात्र संपूर्ण आयुष्यभर एकेक रुपयाला तरसत राहिले, ही फार मोठी शोकांतिका आहे. आज दहा हजार पेक्षा अनेक गाणी वामन दादांची उपलब्ध आहेत.

अशा संघर्षमय व्यक्तीला ३ वेळा क्षयरोगाने ग्रासले मात्र तरीही दादा अखेरच्या श्वासापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करीत राहिले. वामन दादांचं प्रत्येक काव्य एक महत्वाचे तत्वज्ञान आहे.

तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, विठाबाई यांच्या सहवासात राहून मला जीवन कळलं, असेही साहित्यिक बागुल यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक सुनील हेतकर यांनी केले.

सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर मातोंडकर यांनी केले.


दरम्यान, उदघाटन सत्रानंतर 'वामनदादा कर्डक यांचे महाकाव्य' या विषयावर महाचर्चा रंगली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सोमनाथ कदम होते. यावेळी प्रा. सीमा हडकर, प्रा. सिद्धार्थ तांबे यांनी

'वामनदादा कर्डक यांचे महाकाव्य' या विषयावर अभ्यासपूर्ण भाषणे केली. त्यानंतर अध्यक्ष डॉ. सोमनाथ कदम यांनी वामनदादा कर्डक यांच्या साहित्य प्रवासावर भाष्य केले. चर्चासत्रचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.


कार्यक्रमादरम्यान साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कवयित्री सरीता पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

*'तुफानातले दिवे' कविसंमेलनाने आणली रंगत..*

या महाचर्चेनंतर दुपारच्या सत्रात 'तुफानातले दिवे' कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनाच्या 

अध्यक्षस्थानी कवी वीरधवल परब होते यावेळी विचारपीठावर कवी डॉ. अनिल कांबळी, कवयित्री संध्या तांबे उपस्थित होते.यावेळी कवी अरूण नाईक, सुनील कांबळे, प्रा. रुपेश पाटील, मोहन कुंभार, अनिल धाकू कांबळी, विठ्ठल कदम, सिद्धार्थ तांबे, संध्या तांबे, मनिषा जाधव, सरीता पवार,अनिल जाधव, राजेश कदम, कल्पना मलये, मधुकर मातोंडकर, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम,योगेश सकपाळ,  प्रकाश तेंडुलकर, दीपक तळवडेकर, शालिनी मोहाळे, बाळकृष्ण जाधव,  निलम यादव, मनोहर परब, ऋतुजा सावंत-भोंसले, दीपक पटेकर, एकनाथ कांबळे,अनिल कांबळे, मंगल नाईक, संतोष वालावलकर, गौरी डिचोलकर, किशोर वालावलकर यांनी आपापल्या काव्य रचना सादर करीत कविसंमेलनात रंगत आणली.

सूत्रसंचालन प्रतिक पवार यांनी तर आभार किशोर कदम यांनी मानलेत.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी 

विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर, कांता जाधव यांनी प्रयत्न केले.